हिंजवडीच्या PCMC समावेशाला वेग; राहुल कलाटेंचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, 1-3-5 वर्षांचा रोडमॅप जाहीर करण्याची मागणी

नागरिकांच्या अपेक्षा आणि विविध महत्त्वाच्या सूचना मांडणारे निवेदन नगरसेवक राहुल कलाटे यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सादर केले.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 04T183014.719

Rahul Kalate’s memorandum to the Chief Minister : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हिंजवडी परिसराचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत लवकरच समावेश करण्यात येणार असल्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अपेक्षा आणि विविध महत्त्वाच्या सूचना मांडणारे निवेदन नगरसेवक राहुल कलाटे यांनी आज (ता. 4 सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सादर केले. यावेळी हिंजवडी परिसराचा विकास, महापालिका हद्दीत समावेशाची प्रक्रिया आणि भविष्यातील नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

हिंजवडी हे महाराष्ट्राच्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचे महत्त्वाचे केंद्र असून, या परिसरात वेगाने होत असलेल्या नागरीकरणामुळे पाणीपुरवठा, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, सार्वजनिक वाहतूक आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या गंभीर होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करताना, समावेशाची व्याप्ती, कालमर्यादा आणि विकासाचे नियोजन याबाबत शासनाने नागरिकांना स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी राहुल कलाटे यांनी केली.

हिंजवडी परिसराचा वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसराशी थेट संबंध असून, हिंजवडीतील मोठ्या संख्येने नागरिक या भागात वास्तव्यास आहेत. त्यामुळे हिंजवडीच्या महापालिका समावेशाचा परिणाम वाकड, ताथवडे, पुनावळे आणि आसपासच्या परिसराच्या भविष्यातील विकासावरही होणार आहे. हिंजवडीचा विकास करताना लगतच्या परिसराचा एकात्मिक विचार करून नियोजन केले जावे, अशी विनंती करणारी भूमिका राहुल कलाटे यांनी यावेळी मांडली.

समोरून टिंगल, शिव्या; तरी आमचे मंत्री पाय धरायला जातात; जरांगेंवरून भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर

यासाठी शासनाने 1, 3 आणि 5 वर्षांचा स्पष्ट विकास रोडमॅप जाहीर करावा. पाणीपुरवठा, सांडपाणी व कचरा व्यवस्थापनासाठी तातडीच्या उपाययोजनांसह दीर्घकालीन कृती आराखडा तयार करावा. तसेच वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी रस्ते, सार्वजनिक बससेवा, मेट्रो जोडणी, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनाचे टप्पेनिहाय नियोजन नागरिकांसमोर मांडावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

केवळ हिंजवडी गावाचा समावेश होणार आहे की माण, मारुंजी, हिंजवडी, जांभे, गहुंजे, नेरे आणि सांगवडे या सात गावांचा एकत्रित समावेश होणार आहे, याबाबत शासनाने अधिकृत निर्णय, GR अथवा अधिसूचनेद्वारे स्पष्टता द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच PCMC, PMRDA, MIDC आणि संबंधित ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन या संपूर्ण प्रक्रियेबाबत ठोस निर्णय आणि लेखी आश्वासन द्यावे, अशीही मागणी राहुल कलाटे यांनी केली आहे.

हिंजवडी आणि लगतच्या परिसराचा एकात्मिक, शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास व्हावा, हीच या भागातील नागरिकांची अपेक्षा असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे या अपेक्षांना निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वासही राहुल कलाटे यांनी व्यक्त केला आहे.

follow us