समोरून टिंगल, शिव्या; तरी आमचे मंत्री पाय धरायला जातात; जरांगेंवरून भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर

आंदोलन आणि उपोषण करण्याचा अधिकार आहे, मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार आपलं म्हणणं मांडलं पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 04T174104.872

Bhujbal delivers a stinging rebuke to the Mahayuti over the Jarange issue : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून त्यांनी सरकारला 11 तारखेपर्यंत सर्व मागण्या मान्य करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. गुरुवारी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली. मात्र या चर्चेतून तोडगा न निघाल्याने जरांगे उपोषणावर कायम आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत महायुती सरकारलाच खडे बोल सुनावले आहेत.

जात पडताळणी समितीवर कोणत्याही आमदाराने किंवा मंत्र्याने दबाव आणता कामा नये, असं भुजबळांनी स्पष्ट केलं. काही प्रमाणपत्रं समितीने नाकारल्यानंतर ती दुरुस्त करून देण्याची भाषा करणाऱ्या आमदारांवर त्यांनी निशाणा साधला. मुंबईत 4 नगरसेवकांचं जात पडताळणीत प्रमाणपत्र रद्द झालं आहे. त्यामुळे त्यांचं पद गेलं. ते देखील तुम्ही दुरूस्त करून देणार आहात का? असा सवाल करत त्यांनी नाव न घेता प्रसाद लाड यांना टोला लगावला.

कुणबी प्रमाणपत्रांमध्ये खाडाखोड झाल्याचा आरोप करत, असे दाखले स्वीकारणार आहात का? असा सवालही भुजबळांनी केला. त्याचवेळी महायुतीला ओबीसी समाजाच्या पाठिंब्याची आठवण करून देत, ओबीसींनी निवडणुकीत तुम्हाला मदत केली आहे. तुमचं सरकार आणण्यात ओबीसींचा महत्त्वाचा हातभार आहे, असं त्यांनी सुनावलं. स्वतंत्र मराठा-कुणबी कक्षाच्या मागणीवरही भुजबळांनी आक्षेप घेतला. मंत्रालय करायचं असेल तर सर्वच जातींसाठी करा. आमचा दाखल्याला विरोध नाही. मात्र, ओबीसी आरक्षण संपणार नाही हेही बघितलं पाहिजे, असं ते म्हणाले.

पूर्वी नास्तिक नव्हता, पण परिस्थितीनुसार…; विद्यानंद बापटांबद्दल वडिलांनी सांगितली खास गोष्ट

ओबीसी, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाचा उल्लेख करत नक्की कुठलं आरक्षण तुम्हाला पाहिजे? एक विद्यार्थी तीन आरक्षणाचा कसा काय फायदा घेऊ शकतो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जरांगेंच्या भेटीसाठी जाणाऱ्या महायुतीच्या नेत्यांवरही भुजबळांनी निशाणा साधला. आमचे मंत्री सतत लाड पुरवण्यासाठी जात आहे, एक लाड गेले होते लाड पुरवायला, असा टोला त्यांनी लगावला. समोरुन टिंगल केली जातेय, शिव्या दिल्या जाताय तरी मंत्री पाय धरायला जातात. दुसरीकडे कुणी एक शब्द जरी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोललं तरी त्याला पोलिस जाऊन पकडतात, असंही ते म्हणाले. आंदोलन आणि उपोषण करण्याचा अधिकार आहे, मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार आपलं म्हणणं मांडलं पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

निधी वाटपावरूनही भुजबळांनी सरकारला सवाल केला. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळला मदत दिली काही हरकत नाही. पण त्यांना 750 कोटी आणि OBC समाजाच्या समितीला केवळ 5 कोटी हे कसं काय चालेल? असा सवाल करत याच नाराजीतून समन्वय समितीच्या बैठकीतून बाहेर पडल्याचं त्यांनी सांगितलं. एकीकडे मनोज जरांगे सातव्या दिवशीही उपोषणावर ठाम असताना दुसरीकडे छगन भुजबळ यांनी जात पडताळणी, ओबीसी आरक्षण, मराठा-कुणबी कक्ष आणि निधी वाटपावरून आपल्याच सरकारला घेरलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

follow us