पेपर जानेवारीत फुटला तर मार्चमध्ये परीक्षा का घेतली?; रोहित पवारांचा आयोगाला थेट सवाल
या प्रकरणाची तुलना कर्णिक घोटाळ्याशी करत रोहित पवार यांनी आयोगावरील विद्यार्थ्यांचा विश्वासच डळमळीत झाल्याचा दावा केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP) यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जबाबदारी झटकण्यासाठी पेपर जानेवारी 2026 मध्ये फुटल्याचं सांगितलं जात असलं, तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पेपर 20 मार्च 2026 रोजी म्हणजे परीक्षेच्या दोन दिवस आधी मिळाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी कधी शपथ घेतली आणि कधी पदभार स्वीकारला, हा मुद्दा पुढे करण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पेपर जानेवारीतच फुटला होता, तर परीक्षेच्या दोन महिने आधी ही बाब आयोगाच्या लक्षात आली असताना मार्चमध्ये परीक्षा का घेण्यात आली, असा थेट सवाल रोहित पवार यांनी केला. दोन महिने आयोग नेमकं काय करत होता, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाच्या हाताळणीवर नाराजी व्यक्त केली. पेपरफुटीची माहिती आधीच मिळाली असेल तर त्यानंतर परीक्षा घेण्याचा निर्णय कसा झाला, याचं स्पष्टीकरण आयोगाने द्यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली.
डॉ. रुपनवर मृत्यू प्रकरणात माजी मंत्र्यांच्या PAचं कनेक्शन? रोहित पवारांची कठोर कारवाईची मागणी
या प्रकरणाची तुलना कर्णिक घोटाळ्याशी करत रोहित पवार यांनी आयोगावरील विद्यार्थ्यांचा विश्वासच डळमळीत झाल्याचा दावा केला. या प्रकारामुळे अभ्यास करावा की करू नये, अशा द्विधा मनस्थितीत विद्यार्थी असल्याचं सांगत लायब्ररीत बसण्याचीही त्यांची मानसिकता राहिलेली नसल्याचं त्यांनी म्हटलं. संवैधानिक पदाची प्रतिष्ठा आणि लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य लक्षात घेता नैतिक जबाबदारी स्वीकारून आयोगाच्या अध्यक्षांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, वैयक्तिक आणि राजकीय आरोपांबाबत आपण अद्याप 1 टक्काही बोललेलो नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. योग्य वेळ आल्यावर आपण बोलण्यास सुरुवात केली तर केवळ संबंधित व्यक्तीलाच नव्हे, तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या सरकारलाही ते परवडणार नाही, असा दावा त्यांनी केला. आपण पुराव्याशिवाय आरोप करत नाही, असं स्पष्ट करत रोहित पवार यांनी पेपरफुटी प्रकरणावरून सरकार आणि आयोगाला लक्ष्य केलं.
जबाबदारी झटकण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये पेपर फुटल्याचे आपण सांगत आहात, पण मुळात पेपर विद्यार्थ्यांना २० मार्च २०२६ रोजी म्हणजेच परीक्षेच्या दोन दिवस आधी मिळाला होता. त्यामुळे आपण कधी शपथ घेतली आणि कधी पदभार स्वीकारला याचा विषयच येत नाही.
आपण म्हणत असल्याप्रमाणे जानेवारी २०२६… https://t.co/GQqoCoG36b
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 2, 2026