भूतकाळाचे पडसाद, वर्तमानाची धग आणि भविष्याची चाहूल; ‘वेट्टुवम’च्या विश्वाची पहिली झलक प्रदर्शित!
World Of Vettuvam : पा. रंजीत (Pa. Ranjith) यांच्या पहिल्या पॅन-इंडिया चित्रपटाची घोषणा ‘वेट्टुवम’ या नावाने झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
World Of Vettuvam : बहुप्रतिक्षित ‘वेट्टुवम’मध्ये (World Of Vettuvam) जमिनीवरील वर्चस्वासाठी विविध टोळ्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे. या संघर्षांची रचना प्राचीन भारतातील पारंपरिक युद्धकौशल्यांवर आधारित करण्यात आली असून, त्यामुळे संपूर्ण कलाकारांनी विविध प्रकारच्या मार्शल आर्ट्समध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेतले आहे.
पा. रंजीत (Pa. Ranjith) यांच्या पहिल्या पॅन-इंडिया चित्रपटाची घोषणा ‘वेट्टुवम’ या नावाने झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. आज ‘द वर्ल्ड ऑफ वेट्टुवम’ची झलक प्रेक्षकांसमोर आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते आणि अखेर या बहुप्रतिक्षित चित्रपटाची झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. भारतीय सिनेमात यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भव्य विश्वाची अनुभूती या झलकेतून मिळते. वेगवेगळ्या कालखंडांतून प्रवास करणारी कथा, दमदार कलाकारांची फळी आणि भव्य मांडणी यामुळे ‘वेट्टुवम’ची पहिली झलक दिग्दर्शकाच्या दूरदृष्टीची आणि भव्य सिनेमॅटिक विश्वाची झलक दाखवते.
‘द वर्ल्ड ऑफ वेट्टुवम’ सादर करताना निर्मात्यांनी एक खास व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. या व्हिडिओमध्ये हिंदी आवृत्तीसाठी पंकज त्रिपाठी यांनी आवाज दिला आहे, तर तमिळ आवृत्तीत पा. रंजीत, तेलुगूमध्ये राणा दग्गुबाती, कन्नडमध्ये किच्चा सुदीप आणि मल्याळममध्ये सौबिन शाहीर यांनी निवेदन केले आहे. या माध्यमातून चित्रपटाच्या विविध पैलूंची ओळख करून देण्यात आली आहे. चित्रपटात भूतकाळातील घटनांचे परिणाम वर्तमानावर कसे उमटले आहेत आणि त्यांचा परिणाम भविष्यात कसा होऊ शकतो, याचा वेध घेतला जाणार आहे. याच घटनांमुळे नैसर्गिक आपत्तींचे चक्र निर्माण होते, ज्याचा मानवजातीच्या भविष्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
या आकर्षक पहिल्या झलकेत जमिनीवरील वर्चस्वासाठी एकमेकांविरोधात उभ्या ठाकलेल्या अनेक टोळ्या पाहायला मिळतात आणि या संघर्षाला ‘वेट्टुवम’ असे संबोधले जाते. या चित्रपटातून पारंपरिक खेळ मल्लखांबही मोठ्या पडद्यावर एका अनोख्या आणि यापूर्वी कधीही न पाहिलेल्या स्वरूपात सादर केला जाणार आहे. याशिवाय, कलाकारांचे प्रभावी लूकही या पहिल्या झलकेत पाहायला मिळतात, ज्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या चित्रपटात आर्या, व्ही. आर. दिनेश, शोभिता धुलिपाला, कलैयारसन, माइम गोपी, गुरु सोमसुंदरम, शबीर कल्लारक्कल, जॉन विजय, साई धीना, आनंद सामी, हरीश उत्तमन, लिझी, लिंगेश प्रेम कुमार, कविता भारती, अर्जुन, संथा कुमार, मेलडी, मनीषा, निम्मी, राफेल, विक्रम, नवीन आणि प्रकाश यांसारख्या प्रतिभावान कलाकारांची दमदार फळी पाहायला मिळणार आहे.
याशिवाय जी. व्ही. प्रकाश कुमार यांच्या संगीतामुळे चित्रपटाच्या विश्वात आणखी एक वेगळी रंगत निर्माण झाली आहे. पा. रंजीत यांनी साकारलेल्या या भव्य सिनेमॅटिक विश्वाला त्यांच्या संगीताची विशेष साथ लाभली आहे. ‘कबाली’, ‘काला’, ‘सरपट्टा परंबरई’ आणि ‘थंगालन’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे पा. रंजीत ‘वेट्टुवम’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यामुळे हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर साकारला जाण्याची अपेक्षा आहे.
पा. रंजीत लिखित आणि दिग्दर्शित ‘वेट्टुवम’ हा चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये पॅन-इंडिया स्तरावर प्रदर्शित होणार आहे. एस. साई देवानंद, एस. साई व्यंकटेश्वरन आणि पा. रंजीत यांची निर्मिती असलेला हा चित्रपट Learn and Teach Production आणि Neelam Productions या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. ‘वेट्टुवम’ डिसेंबर 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.