Raj Thackeray On Karjat Torrent Project: कर्जतच्या सायडोंगर परिसरातील गुजरातच्या टोरेंट कंपनीच्या प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘हे सगळं महाराष्ट्राला लुबाडण्यासाठी सुरू आहे. मुंबई गुजरातला जोडण्याची मनषा त्यामागे आहे,’ असा आरोप त्यांनी केला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधताना, ‘देवाच्या काठीला आवाज नसतो, ती ज्या दिवशी बसेल त्या दिवशी तुम्ही केलेली पापं आठवतील,’ असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. कर्जतमधील जाहीर सभेत ते बोलत होते.
राज्यात FDA ची धडक कारवाई! 6,495 किलो अन्नसाठा जप्त; किंमत तब्बल 24.92 लाख रुपये
‘हा प्रकल्प नेमका कुणाच्या भल्यासाठी?’
कर्जतमध्ये एवढा मोठा प्रकल्प उभारला जात असताना त्याची चर्चा ग्रामसभेत झाली का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या प्रकल्पातून तयार होणारी वीज महाराष्ट्राला मिळणार का आणि तिचे वितरण कोणत्या खासगी उद्योगपतीच्या माध्यमातून केले जाणार, याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज ठाकरे म्हणाले, “या सगळ्या लोकांचं लक्ष फक्त एमएमआर परिसरावर आहे. मुंबई गुजरातला मिळवायची ही मनषा त्यामागे आहे, हे त्यांचं दुखणं आहे. उद्या त्यांचेच खासदार, आमदार ते जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत असेल. 2029 साली निवडणुका आहेत. या अडीच तीन वर्षात महाराष्ट्राची काय विल्हेवाट लावतील काय माहिती?”
देवाभाऊंना नाकीनऊ आणण्याचं होतं पण, बिचुकलेंची गाडी शिक्षकांनी 19 मतांवरच अडकवली…
पंप स्टोरेज प्रकल्पासाठी पाणी उचलण्याकरिता वीज लागते. त्यासाठी वेगळी सौरऊर्जा निर्माण केली आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. महाराष्ट्रात येणाऱ्या डेटा सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागणार आहे. या डेटा सेंटरला वीज पुरवण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे का, असा सवाल त्यांनी केला.
“कर्जतमधील पंप स्टोरेज प्रकल्पात वीज तयार झाल्यानंतर त्याचं वितरण कसं होणार आहे? कुठे होणार आहे? फक्त महाराष्ट्रासाठी होणार आहे का? ते कुणाच्या मार्फत होणार आहे? हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे. ही सगळी व्यवस्था ही खासगी व्यक्तीच्या मार्फत राबवली जाणार आहे. एकाच व्यक्तीसाठी हे सगळं केलं जात आहे,” असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
इतका मोठा प्रकल्प उभारताना ग्रामसभा, ग्रामपंचायत आणि विधानसभेत चर्चा झाली होती का? झाली असेल तर त्याची माहिती मराठीत उपलब्ध करून दिली आहे का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
‘जंगलाच्या अंतिम संस्काराला आलोय असं वाटलं’
कर्जतच्या जंगलातील झाडे तोडण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरे यांनी प्रकल्पाला विरोध दर्शवला. “कर्जतच्या जंगलातील झाडं तोडली, तिथे गेलो होतो, लाकडे रचून ठेवली होती. जंगलाच्या अंतिम संस्काराला आलोय असंच वाटलं. इतक्या वर्षांची जुनी झाडं कोणत्या तरी गुजरात्यासाठी म्हणून कापून टाकतायेत,” अशी टीका त्यांनी केली.
“या प्रकल्पाची काय गरज आहे? या सगळ्या गोष्टींच्या मागचे षडयंत्र समजून घेतलं पाहिजे,” असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केंद्रात बसलेल्या नेत्यांकडून किंमत दिली जात नाही, अशी टीका करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
राज ठाकरे म्हणाले, “या प्रकल्पाचे टेंडर नाही, काही नाही, अशीच जमीन देऊन टाकलीय. आमचा सह्याद्री पोखरणार? छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ते दोन लोक चालवणार.” महाराष्ट्रात कोणती जमीन कोणाला द्यायची, हे वरच्या स्तरावर ठरवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘इंटरनेट बंद केलं तर सूर्य उगवायचं थांबतो का?’
प्रकल्पाच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट बंद करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. “इंटरनेट बंद केलं म्हणे. इंटरनेट बंद केलं तर सूर्य उगवायचं थांबतो का? मन स्वच्छ असतं तर ही करण्याची वेळ आली नसती,” असे ते म्हणाले.
“23 प्रकल्पांपैकी 3 केंद्र सरकारचे, बाकीचे 20 प्रकल्प हे खासगी आहेत. आता एआय डेटा सेंटर येत आहे. त्याला पाणी, वीज लागणार आहे. कॉलनी येणार, माणसं येणार,” असे सांगत हे प्रकल्प स्थानिकांच्या हितासाठी नसल्याचा आरोप त्यांनी केला.
MLC Result : एक ‘जायंट किलर’ तर दुसरा ‘किंगमेकर’; साबळे अन् कराळेंनी भल्या-भल्यांना घाम फोडला?
“छत्रपती शिवाजींचे महाराष्ट्रातील मावळे म्हणून आम्ही सांगायचे आणि आम्ही उठत नाही. जेवढा विरोध होईल तेवढं हे सरकार वीज बंद करेल, इंटरनेट आता बंद केले आहे. सरकार सांगेल या प्रकल्पाची महाराष्ट्राला किती गरज आहे. विजेची गरज आहे, असे सांगितले जाईल. हे घडवलं जाईल. सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्रावर आहे. हे प्रकल्प दुसऱ्यांसाठी आहेत,” असे राज ठाकरे म्हणाले.
‘देवाच्या काठीचा आवाज येत नाही’
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, “मला अमित शाहांना सांगायचं आहे. कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा आवाज येत नाही. ती ज्या दिवशी तुम्हाला बसेल त्या दिवशी कळेल तुम्ही काय काय पापं केलीत.”
महाराष्ट्रातील चांगल्या जागांचे व्हिडीओ प्रसारित केले जातात आणि त्यातून उद्योगपतींचे त्या जागांकडे लक्ष जाते, असा आरोपही त्यांनी केला. “तुम्ही महाराष्ट्रातल्या चांगल्या जागा आहेत त्या ठिकाणचे व्हिडीओ करून टाकता. ते फक्त महाराष्ट्र बघत नसतो, तर ते उद्योगपती बघत असतात. मग त्यावर त्या उद्योगपतींची नजर जाते. त्या जागा उद्योगपती विकत घेतात आणि महाराष्ट्राची वाट लावतात. त्यामुळे आपण हे व्हिडीओ आणि जागा कोणाच्या हातात देतो याचं भान ठेवा,” असे राज ठाकरे म्हणाले.
‘शिवसेनेचे 40 आमदार फोडण्यासाठी 2 हजार कोटी कुठून आले?’
शिवसेनेतील फुटीचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी पैशांच्या व्यवहारावरूनही सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, “50 खोके, एकदम ओक्के याचा अर्थ काय? एक खोका म्हणजे एक कोटी. शिवसेनेचे 40 आमदार फोडले. त्यासाठी जर दोन हजार कोटी खर्च झाले असतील तर ते आले कुठून? तुमची पोरं तुमची लाज काढतील. माझा बाप बेसावध निघाला. जेव्हा त्याने महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्यावेळी लक्ष दिलं नाही.”
निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांची चोरी करून सत्तेवर कायम राहता येतं, असा आरोपही त्यांनी केला. “ते फक्त एकाच गोष्टीला घाबरतात. जर तुम्ही जिवंत असाल आणि जागे व्हाल तर सरकार घाबरेल. अन्यथा तुमची जंगलं अशीच जाणार, तुमची घरं अशीच जाणार,” असे राज ठाकरे म्हणाले.
‘मी उद्योगधंद्याच्या विरोधात नाही’
आपण उद्योगधंद्यांच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट करत राज ठाकरे म्हणाले, “मी काही उद्योगधंद्याच्या विरोधात नाही. महाराष्ट्रात प्रगती झालीच पाहिजे, तुमच्या घरात वैभव आलंच पाहिजे. पण हे महाराष्ट्राने ठरवलं पाहिजे, बाहेरच्या लोकांनी ठरवू नये. तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही कसं जिवंत राहिलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे.”
महाराष्ट्राच्या इतिहासाचा संदर्भ देत त्यांनी मराठी माणसाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. “छत्रपती शिवछत्रपतींचं निधन झालं, त्यानंतर पुढच्या सव्वाशे वर्षापर्यंत संपूर्ण प्रांतावर मराठ्यांचं राज्य होतं. मराठे त्यावेळी लढत होते. मग आज काय झालं? मराठी माणूस आज का थंड बसलाय?” असा सवाल त्यांनी केला.
“उद्या, तुमच्याही दरवाज्यावरती टकटक होणार, सावध राहा. महाराष्ट्र जिवंत आहे की नाही हे तुम्ही ठरवा. महाराष्ट्र राहिला पाहिजे, तो मराठी माणसांचा राहिला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं नेतृत्व तरुणांनी हाती घ्यावं, मी तुम्हाला साथ देईन,” असा विश्वास राज ठाकरे यांनी सभेत व्यक्त केला.
