MLC Result : एक ‘जायंट किलर’ तर दुसरा ‘किंगमेकर’; साबळे अन् कराळेंनी भल्या-भल्यांना घाम फोडला?

विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला खरा परंतू दोन उमेदवारांनी निवडणुकीत प्रस्थापितांना गार केलंयं.

nitesh karale

Raviraj Sable & Nitesh Karale News : एकीकडे विधानपरिषदेच्या विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरु असतानाच संपूर्ण राज्यभरात चर्चा सुरु आहे ती फक्त दोघांची. ही नावे कोणाला माहिती नाही, असं कुणीचं नाही. एक म्हणजे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रविराज साबळे पाटील (Raviraj Sable) आणि दुसरं नाव म्हणजे नागपूर पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नितेश कराळे (Nitesh Karale). प्रस्थापित उमेदवारांसमोर एकाने जायंट किलर तर दुसऱ्याने किंगमेकरची भूमिका बजावलीयं. या दोन्ही उमेदवारांनी या निवडणुकीत अक्षरश: घामच फोडल्याचं बोललं जातंय.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात सोशल मीडियावर ‘सर’ म्हणून ओळखले जाणारे नितेश कराळे यांनी 24 हजार 249 मते मिळविली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सोशल मीडियावरील लोकप्रियतेमुळे चर्चेत आलेले अपक्ष उमेदवार रविराज साबळे पाटील यांना 19 हजार 835 मते मिळाली. या दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे पारंपरिक राजकीय संघटनांबाहेरील व्यक्तींच्या लोकप्रियतेची निवडणुकीतील भूमिका अधोरेखित झालीयं. या निवडणुकीत रविराज साबळे आणि नितेश कराळे यांची भूमिका कशी ठरली? पाहुयात…

…अन् रविराज साबळे जायंट किलर
साबळे यांनी प्रस्थापित नेत्यांच्या बलाढ्य यंत्रणेला सुरुवातीपासूनच आव्हान देत जवळपास 20 हजार मते खेचून आणत ‘जायंट किलर’ची भूमिका बजावलीयं. रविराज साबळे यांना पहिल्या फेरीत 7 हजार 424 मते घेतली. दुसऱ्या फेरीत साबळे यांनी 14,598 मतांपर्यंत मजल मारली. तर तिसऱ्या फेरीत साबळेंनी 19,835 मते घेत तिसरा क्रमांक भक्कमपणे पटकावलायं. मतमोजणीच्या प्रक्रियेत महायुतीकडून विद्यमान आमदार असलेल्या सतीश चव्हाण यांना तिसऱ्या फेरीअखेर 60 हजार 768 मते मिळाली तर शरद पवार गटाकडून प्रतापसिंह पाटलांना 73 हजार 931 मते मिळाली.

दोन्ही उमेदवारांच्या मतांमध्ये 13 हजार 163 मतांचा फरक राहिला. जर अपक्ष उमेदवार रविराज साबळे यांनी घेतलेली मते 20 हजार मते विभागले नसते तर ही मते पारंपारिक महायुती किंवा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली असती, आणि सतीश चव्हाण आघाडीवर दिसले असते. त्यामुळे साबळे यांच्या अपक्ष उमेदवारीचा मोठा दणका चव्हाण यांनी बसलायं.

मराठवाड्यानंतर विदर्भातील सर म्हणून प्रचलित असलेले नितेश कराळे मास्तरांनीही यंदा दुसऱ्यांदा लढवलेल्या निवडणुकीत प्रस्थापितांचा धुरळाच उडवून टाकलायं. नागपूर पदवीधर मतदारसंघातून शरद पवार गटाकडून इच्छूक असलेले नितेश कराळे यांना उमेदवारी डावलण्यात आली. महाविकास आघाडीची जागा कॉंग्रेसला सुटल्याने नितेश कराळेंनी अपक्ष अर्ज दाखल करीत दुसऱ्यांदा आपलं नशीब आजवमावलं. याचे परिणाम म्हणून बंडखोरी केल्याने कराळे मास्तरांची शरद पवार गटातून हकालपट्टीही करण्यात आली होती. तरीही हार न मानता कराळेंनी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली.

नागपूर मतदारसंघात नितेश कराळे मास्तर किंगमेकरच्या भूमिकेत…
निवडणुकीत विजय आपलाच होईल, असा विश्वास व्यक्त करीत नितेश कराळे यांना निवडणुकीत 24 हजार 249 मते मिळाली आहेत. तर बाद फेरीत २५ उमेदवार बाद झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांची एकत्रित स्थिती पाहता कोहळे यांना 61 हजार, तर महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांना 56 हजार 730 मते मिळाली आहेत. दोघांच्या मतांमध्ये 4 हजार 271 मतांचा फरक आहे. आत्ताची स्थिती पाहता महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळेच विजयी होणार आहेत. अद्याप विजयाची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नसून विजयाबाबतही औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे नागपूर मतदारसंघात शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार नितेश कराळे किंगमेकरच ठरल्याचं बोललं जातंय.

हारकर जीतनेवालो को बाजीगर कहते है…
आपल्या पराभवानंतर नितेश कराळे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करीत विरोधकांना डायलॉगबाजीतून इशारा दिला आहे. माझा पराभव झाला असला तरी जितके मतदान मला मिळाले आहे. त्यावरून मी कुणाचाही गेम पलटू शकतो, असा इशारा देत त्यांनी हारकर जीतनेवालो को बाजीगर कहते है, अशी डायलॉगबाजी केलीयं.

दरम्यान, पारंपरिक राजकीय पक्षांच्या संघटनात्मक ताकदीच्या तुलनेत स्वतंत्र उमेदवारांनी मिळविलेला प्रतिसाद हा बदलत्या प्रचारपद्धतींच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातोयं. सोशल मीडियामुळे उमेदवारांना कमी वेळेत मोठ्या संख्येने मतदारांपर्यंत पोहोचता येतं, हे रिल्सस्टार रविराज साबळे आणि नितेश कराळे यांनी दाखवून दिलंय.

follow us