चंद्रकांत पाटलांची निवड योग्य ठरली… भाजपसाठी अवघड मतदारसंघात गुलाल

Kaustubh Gawade पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपला आतापर्यंत कधीच विजय मिळाला नव्हता. तो गावडे यांनी मिळवून दिलाय

  • Ninad K
  • Written By: Published:
Kaustubh Gawade Beat Pune Graduate MLC Election

How Kaustubh Gawade Beat Pune Graduate MLC Election : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवला आणि राजकीय वर्तुळात एका प्रश्नाची चर्चा सुरू झाली ती म्हणजे विद्यमान आमदार जयंत आसगावकर आणि शिक्षक चळवळीतील परिचित चेहरा दत्तात्रय सावंत यांना मागे टाकत गावडे यांनी बाजी कशी मारली? या विजयामागे केवळ भाजपची संघटनात्मक ताकद होती, की गावडे यांची शैक्षणिक क्षेत्रातील पार्श्वभूमीही निर्णायक ठरली? विशेषतः कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील त्यांचा अनुभव आणि शिक्षकांशी असलेला संपर्क या निवडणुकीत महत्त्वाचा ठरल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर, गावडे यांच्या उमेदवारीसाठी चंद्रकांत पाटील आग्रही होते. पुणे शिक्षक  मतदारसंघात भाजपला आतापर्यंत कधीच विजय मिळाला नव्हता. तो विजय गावडे यांनी मिळवून दिला आहे. दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या होमटाऊनमध्ये म्हणजेच पदवीधर मतदारसंघात अपयश आले असले तरी, शिक्षक मतदारसंघात गावडे यांची त्यांनी केलेली निवड अचूक ठरल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. गावडे यांच्या विजयामागे नेमके कोणते घटक महत्त्वाचे ठरले? आसगावकर यांच्यासारख्या विद्यमान आमदाराला आणि सावंत यांच्यासारख्या शिक्षक चळवळीतील नेत्याला अपेक्षित यश का मिळालं नाही? या निकालामागचे पाच महत्त्वाचे फॅक्टर समजून घेऊया.

1. गावडे यांच्या उमेदवारीमागे विवेकानंद शिक्षण संस्थेचं गणित

गावडे यांच्या या विजयाची गोष्ट समजून घ्यायची असेल, तर सर्वप्रथम कौस्तुभ गावडे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील भूमिकेकडे पाहावं लागेल. गावडे हे कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. डॉ. बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेली ही संस्था राज्यातील मोठ्या शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणून ओळखली जाते. रयत शिक्षण संस्थेनंतर मोठं जाळं असलेल्या संस्थांमध्ये याची गणना केली जाते. या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्याशी जोडलेले शिक्षक, प्राध्यापक आणि शैक्षणिक कर्मचारी यांचं विस्तृत जाळं. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला या माध्यमातून अनेक शिक्षकांशी संपर्क साधण्याची आणि त्यांच्या प्रश्नांची जवळून ओळख होण्याची संधी मिळते.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत हा संपर्क महत्त्वाचा ठरू शकतो. कारण, इथे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ राजकीय नेत्यांचा पाठिंबा पुरेसा नसतो. शिक्षकांशी थेट संवाद, त्यांच्या अडचणींची जाण आणि शिक्षण व्यवस्थेतील कामाचा अनुभव यांनाही महत्त्व असतं. भाजपने गावडे यांना उमेदवारी देताना त्यांच्या या पार्श्वभूमीचा विचार केला असावा. संस्थेतील शिक्षकांचं जाळं आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांची ओळख ही त्यांच्या जमेची बाजू ठरल्याचे बोलले जात आहे. अर्थात, या संस्थेतील शिक्षकांची मतं एकत्रितपणे गावडेंनाच मिळाली, असं ठामपणे सांगता येणार नाही. मात्र, उमेदवाराची शैक्षणिक क्षेत्रातील ओळख आणि त्यातून निर्माण होणारा संपर्क ही गावडे यांच्या उमेदवारीमागील महत्त्वाची बाब ठरली.

2. पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ अन् सोबतीला भाजपच्या संघटनात्मक ताकदीची जोड

विवेकानंद शिक्षण संस्थेतील अनुभव हा गावडेंच्या विजयाचा एक संभाव्य घटक असला, तरी त्याला भाजपच्या संघटनात्मक ताकदीची जोड मिळाली. पुणे शिक्षक मतदारसंघाचं क्षेत्र केवळ पुण्यापुरतं मर्यादित नाही. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा पाच जिल्ह्यांतील शिक्षक मतदार या निवडणुकीत सहभागी होतात. इतक्या मोठ्या क्षेत्रातील मतदारांपर्यंत पोहोचणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि प्रचाराचं नियोजन करणं हे कोणत्याही उमेदवारासाठी आव्हान असतं. शिक्षक मतदारसंघात मतदारांची संख्या तुलनेने मर्यादित असली, तरी प्रत्येक मत महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे वैयक्तिक संपर्कासोबतच स्थानिक पातळीवरील संघटनात्मक यंत्रणाही महत्त्वाची ठरली. गावडे यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याने पक्षातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पाच जिल्ह्यांत पोहोचण्याची संधी मिळाली. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवाला पक्षाच्या संघटनात्मक ताकदीची जोड मिळाली.

3. विद्यमान आमदार जयंत आसगावकरांना धक्का कसा बसला?

या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांचा पराभव. विधान परिषदेतील प्रतिनिधित्वाचा अनुभव आणि शिक्षक मतदारसंघातील ओळख असूनही आसगावकर यांना पुन्हा विजय मिळवता आला नाही. विद्यमान आमदार असल्याचा फायदा उमेदवाराला होऊ शकतो. पण, मतदारसंघातील प्रश्न, शिक्षकांशी असलेला संपर्क आणि कामाचा अनुभव या गोष्टी त्याच्या बाजूने असतात. मात्र, शिक्षक मतदारसंघात केवळ पदावर असणं पुरेसं ठरत नाही. मतदारांशी सातत्याने संवाद, संघटनात्मक पाठबळ आणि उमेदवाराबद्दलची धारणा यांचाही निकालावर परिणाम झाल्याचे आसगावकर यांच्या पराभवाचे एक कारण असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

4. दत्तात्रय सावंत यांची ओळखही पुरेशी ठरली नाही

या निवडणुकीतील दुसरं महत्त्वाचं नाव म्हणजे दत्तात्रय सावंत. शिक्षक चळवळीतील परिचित चेहरा म्हणून सावंत यांची ओळख आहे. शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करण्याचा अनुभव आणि त्यांच्याशी असलेला संपर्क ही त्यांची जमेची बाजू होती. त्यामुळे निवडणुकीत त्यांच्याकडूनही अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, शिक्षकांच्या प्रश्नांवर संघर्ष करणं आणि निवडणुकीत व्यापक मतदारांचा पाठिंबा मिळवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या उमेदवाराची चळवळीतील ओळख महत्त्वाची असते; पण प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारसंघातील संपर्क, प्रचाराचं नियोजन, संघटनात्मक ताकद आणि इतर उमेदवारांची उपस्थिती यांचाही परिणाम होतो. गावडे यांच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर सावंत यांना अपेक्षित यश न मिळणं हा मुद्दा चर्चेत आला आहे.

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक म्हणजे केवळ राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली लढत नव्हे. शिक्षकांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित प्रश्नही या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असतात. रिक्त पदं, सेवाशर्ती, पदोन्नती, प्रशासकीय कामांचा वाढता भार आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळण्याचा प्रश्न हे शिक्षकांसाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत. गावडे यांनी शिक्षकांवरील बिगरशैक्षणिक कामांचा भार कमी करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय मदतव्यवस्था उभारण्याची भूमिका मांडली होती. शिक्षकांचा वेळ कागदपत्रं, नोंदी आणि इतर प्रशासकीय कामांमध्ये खर्च होण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी वापरला जावा, हा या भूमिकेमागील विचार होता. शिक्षण संस्थेतील प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असल्याने गावडे यांना या प्रश्नांची व्यावहारिक बाजू होती. त्यामुळे त्यांच्या प्रचारात शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आणि शिक्षकांच्या प्रश्नांवरील भूमिका या दोन्ही बाबी महत्त्वाच्या ठरल्या.

महायुतीतच वेगवेगळे उमेदवार

या निवडणुकीला राजकीय महत्त्व मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे महायुतीतील दोन पक्षांची स्वतंत्र भूमिका. राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महायुतीत एकत्र असली, तरी पुणे शिक्षक मतदारसंघात दोन्ही पक्षांची पसंती एकाच उमेदवाराला नव्हती. शिंदे यांच्या शिवसेनेने सुरुवातीला मंगेश चिवटे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र, नंतर चिवटे यांनी माघार घेतली. त्यानंतर शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला. या घडामोडींमुळे निवडणुकीत भाजपचे कौस्तुभ गावडे आणि शिंदेसेनेचा पाठिंबा असलेले सचिन सानप यांच्यातील स्पर्धेला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालं. महायुतीतील दोन घटक पक्षांनी वेगवेगळ्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याने ही लढत केवळ शिक्षक मतदारसंघापुरती मर्यादित राहिली नाही; त्यात दोन्ही पक्षांच्या राजकीय ताकदीची चर्चाही जोडली गेली. अखेर गावडे यांनी विजय मिळवला, तर सानप दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे या निकालाकडे भाजपच्या उमेदवाराच्या विजयासोबतच महायुतीतील अंतर्गत राजकीय समीकरणांच्या संदर्भातही पाहिलं जात आहे.

या निवडणुकीने दोन गोष्टी ठळक केल्या. पहिली म्हणजे, शिक्षक मतदारसंघात शैक्षणिक क्षेत्रातील ओळख आणि संपर्क यांना महत्त्व असू शकतं. दुसरी म्हणजे, विद्यमान आमदार असणं किंवा शिक्षक चळवळीतील परिचित चेहरा असणं, यापैकी कोणतीही बाब विजयाची हमी देत नाही. गावडे यांचा विजय जरी झाला असला तरी, आता त्यांच्यासाटी खरी परीक्षा सुरू झाली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न, सेवाशर्ती, पदोन्नती आणि बिगरशैक्षणिक कामांचा वाढता भार अशा प्रश्नांवर त्यांनी प्रचारात मांडलेल्या भूमिकांचा पाठपुरावा करावा लागणार आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेतील अनुभव आणि शिक्षकांशी असलेल्या संपर्काचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला असेल, तर आता त्याच अनुभवाचा उपयोग शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी कितपत होतो, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, निवडणुकीतील विजय हा शेवट नसतो; तो शिक्षकांनी दिलेल्या विश्वासाची सुरुवात असतो. या विश्वासाचं रूपांतर प्रत्यक्ष कामात करण्यात कौस्तुभ गावडे कितपत यशस्वी होतात, यावरच त्यांच्या पुढील कार्यकाळाचं मूल्यमापन होणार आहे.

follow us