Vidhan parishad Result : शिक्षक, पदवीधरची रणधुमाळी! 5 जागांवर कोण मारणार बाजी…महायुती की महाविकास आघाडी?
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीची 5 मतदारसंघात आज मतमोजण होणार असून सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.
Vidhan Parishad Result : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर (Vidhan Parishad Result ) अखेर आज मतमोजणी पार पडणार आहे. अर्थात विधान परिषदेच्या 5 जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. थोड्याच वेळात 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून या निवडणुकीत महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी? याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या या रणधुमाळीत तब्बल 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालं असून नागपूर, अमरावती, पुणे आणि औरंगाबाद या मतदारसंघांमधील लढतींमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पाच जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत अनेक जिल्ह्यांत मित्रपक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळाली तर काही मतदारसंघात बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांच्या आव्हानामुळे राजकीय समीकरणे जास्तच गुंतागुंतीची झाली आहेत. त्यामुळे आता या पाच जागांसाठी मतमोजणीचा सस्पेन्स शिगेला पोहोचला असून या राज्यात महायुती की महाविकास आघाडीची संघटनात्मक ताकद जास्त आहे हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या पाच जागांच्या निवडणूक निकालांवरुन राज्यातील महायुतीतील घटक पक्ष आणि महाविकास आघाडमधील घटक पक्ष नेमकं कोणाला आत्मपरिक्षण करावं लागणार आहे हे या निकालांवरुन स्पष्ट होणार आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सतीश चव्हाण हे या निवडणुकीत पुन्हा एकदा रिंगणात उतरले होते. यापूर्वी सलग तीन वेळा विजय मिळवलेल्या चव्हाण यांच्यासाठी ही चौथी निवडणूक आहे. मतदारांचा घटलेला प्रतिसाद आणि उमेदवारांची मोठी संख्या यामुळे निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे मंगेश वानखेडे आणि शिक्षक भारतीचे अतुल देशमुख हेही निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नितेश कराळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्याने या लढतीत आणखी रंगत आली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर, शिवसेनेचे सचिन सानप आणि अपक्ष दत्तात्रय सावंत यांच्यासह इतर उमेदवारांमध्ये लढत होत आहे. महायुतीतील उमेदवारी आणि पक्षीय पाठिंब्याबाबतच्या घडामोडींमुळे या निवडणुकीची चुरस वाढली आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात अदिती पोहरे (काँग्रेस) दत्तात्रय लहाने (ठाकरे गट), किरण सरनाईक (शिवसेना), दिलीप कड (विदर्भ.माध्यमिक.शिक्षक संघ) या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत झाली. परंतु याच जागेत बंडखोरीही पाहायला मिळाली. शिवसेना पक्षातील श्रीकांत देशपांडे (माजी आमदार) भाजपाचे आमदार राजेश वानखेडे यांचे मेहुणे शेखर भोयर, भाजप आमदार उमेश यावलकर यांचे निकटवर्तीय सुमित पवार, भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या बहीण संगीता शिंदे यांनी बंडखोरी करत या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान, मतदानानंतर मतमोजणी आणि निकालाकडे राजकीय पक्षांसह उमेदवारांचे लक्ष लागणार आहे. महायुतीतील बंडखोरी, पक्षांतर्गत नाराजी आणि महाविकास आघाडीतील मैत्रीपूर्ण लढती यांचा निकालावर काय परिणाम होतो, हे निकालानंतर स्पष्ट होईल.