Rohit Pawar Baramati 15 year old girl death case : बारामतीत आमदार रोहित पवार यांच्या PA च्या (स्वीय सहाय्यक) 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट देत डॉक्टर तसेच पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण तपासातून समोर येईल, त्यामुळे शवविच्छेदन आणि पोलिस तपासाच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
रोहित पवार म्हणाले की, त्यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे हे जिल्हा परिषद काळापासून त्यांच्यासोबत काम करत आहेत. त्यांच्या 15 वर्षीय मुलीचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. एवढ्या कमी वयात अशी घटना घडणे हे समजण्यापलीकडचे आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी आणि डॉक्टरांशी चर्चा केली असून, तपास पूर्ण होईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मी जर मेलो तर मग करा तुम्हाला काय करायचं ते, 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी मनोज जरांगे भावनिक
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे करून सत्य समोर आणावे, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
बारामतीच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न
या घटनेच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी बारामतीतील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरही प्रश्न उपस्थित केले. सामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल, तर ते कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या एका घटनेवरून लगेचच बारामतीतील पोलिसांचा वचक कमी झाला आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
बारामतीसह राज्यातील विविध घटनांबाबत गृह विभाग कमी पडत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बारामतीत यापूर्वी समोर आलेल्या नवजात मुलीच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला.
बारामतीत सीसीटीव्ही यंत्रणेची गरज
बारामती शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांच्या कार्यकाळात बारामतीतील प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही बसवण्याचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. कर्जत-जामखेडमध्येही सीसीटीव्ही प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. मात्र, अनेक वर्षे उलटूनही बारामतीतील हा प्रकल्प पूर्ण का झाला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ऑस्ट्रेलियाने पराभवाचा वचपा काढला; बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटी दोन दिवसांत जिंकली
ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे समोर आल्याचे पवार यांनी सांगितले. मोठ्या शहरांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘तपासात हलगर्जीपणा झाल्यास महागात पडेल’
अल्पवयीन मुलीच्या मृत्यूच्या तपासात पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होऊ नये, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. पोलिसांकडून कामात हलगर्जीपणा झाल्यास ते महागात पडेल, असे ते म्हणाले. मात्र, तपास पूर्ण होण्यापूर्वी घटनेबाबत कोणतेही प्राथमिक निष्कर्ष काढण्यास त्यांनी नकार दिला.
व्हायरल पत्रावरही रोहित पवारांची प्रतिक्रिया
दरम्यान, बारामतीतील कायदा-सुव्यवस्थेबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. या पत्रातील गुन्हेगारीचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीतील कायदा-सुव्यवस्थेबाबत आपण यापूर्वीही आवाज उठवला असल्याचे पवार म्हणाले.
“राहुल गांधींचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे” फडणवीसांचा हल्लाबोल
अजित पवार यांच्या काळात बारामतीत पोलिसांचा वचक होता, असा दावा करत सध्या शहरातील कायदा-सुव्यवस्थेची घडी विस्कटल्याचा आरोप त्यांनी केला. व्यापाऱ्यांना धमकावण्याच्या घटना घडत असल्याचाही त्यांनी दावा केला. पोलिस अधीक्षकांसोबत बैठक घेतल्यानंतर काही दिवसांत अडीच कोटी रुपयांचा गांजा पकडण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
‘योग्य वेळी आरोपांना उत्तर देणार’
व्हायरल पत्रावरून काही कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या आरोपांवरही पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ‘चिरकुट लोक’ यावर वक्तव्य करत असल्याची टीका त्यांनी केली. मात्र, सध्या अशा आरोपांवर प्रतिक्रिया देणे टाळणार असून योग्य वेळी त्यांना उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बौद्धिक पातळी खालावलेल्या लोकांवर बोलण्यात अर्थ नसल्याचे सांगत, एखादा नेता किंवा मंत्री अशा प्रकारचे वक्तव्य करत असेल तर त्याला उत्तर देणे अधिक योग्य असल्याचे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, 15 वर्षीय मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत सध्या कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. पोलिस तपास आणि शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
प्राजक्ता माळीच्या ‘डिंक्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात; तिचा नवा लूक चर्चेत!
