Rohit Pawar gives the government a two-day ultimatum : पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून आंदोलनाला आता राजकीय रंग चढताना दिसत आहे. विविध मागण्यांमुळे आंदोलनात वेगवेगळे गट निर्माण झाले असले तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे. हर्षवर्धन सपकाळ, संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली असून शरद पवार यांनीही या आंदोलनात लक्ष घातले आहे. दरम्यान, आज मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे देखील विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. एबीपी माझाशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुणे शहर बंद करण्याचा किंवा मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय विद्यार्थी आणि त्यांचे पालक घेऊ शकतात. 7 किंवा 8 ऑक्टोबर रोजी राहुल गांधी पुण्यात येण्याची शक्यता असून त्या दिवशी एक लाखांहून अधिक विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा दावा त्यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर राजकारण नको, आधी प्रश्न सुटू द्या, आंदोलनस्थळी नितेश राणेंची भूमिका स्पष्ट
दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र काम करावे, असे आवाहन करत रोहित पवार यांना आपला मित्र संबोधले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, नितेश राणे यांनी मला ऑफर देण्यापेक्षा विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवावेत. सरकारविरोधात वातावरण निर्माण झाल्यामुळेच ते अशी वक्तव्ये करत आहेत. धाडस असेल तर त्यांनी विरोधी बाकांवर बसावे, आमचे सरकार आल्यावर एकत्र काम करू, असा टोला त्यांनी लगावला. सध्या नितेश राणे भरकटलेले दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली.
विद्यार्थ्यांचा प्रश्न हा राजकारणाचा विषय नाही, या नितेश राणे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत, असे सांगतानाच रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षातील काही नेतेच या आंदोलनाला राजकीय वळण देत असल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करू नये, हा संदेश सत्ताधारी आमदारांनाही द्यावा, असे त्यांनी म्हटले.
तसेच एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा करत, एमपीएससीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून संस्थेची साफसफाई करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करून सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
