मी तीन दिवस झोपलो नाही, पण लोकांसाठी निर्णय घेतला, सचिन अहिर यांची भावनिक कबुली

आमच्या मागे ना ठाकरे नावाचा वलय, ना पवार नावाचा वलय. आम्ही आहोत जी काम करण्याची जबाबदारी आम्हाला दिली जाते, त्यावर काम करण्याचा प्रयत्न करतो.

Untitled Design (32)

Untitled Design (32)

Sachin Ahir’s emotional admission : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पक्षांतराबाबत बोलताना सचिन अहिर यांनी आपल्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. निष्ठावान या शब्दावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी स्पष्ट सांगितले की, आपण इतर पक्षातून आलो तर त्याचं स्वागत करतो आणि आपल्याकडून गेलं तर त्याला नालायक म्हणतो, हे उचित होणार नाही. सचिन अहिर म्हणाले, आमच्या मागे ना ठाकरे नावाचा वलय, ना पवार नावाचा वलय. आम्ही आहोत जी काम करण्याची जबाबदारी आम्हाला दिली जाते, त्यावर काम करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच अनेक संधी असूनही आपण यापूर्वी वेगळी भूमिका घेतली नव्हती, असे त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलताना अहिर म्हणाले, 2024 साली पण मला आमदारकी लढवा असं सांगितलं होतं. पण मी भूमिका घेतली की आदित्यजींना आपण साथ देण्याचं ठरवलं तर साथ द्यायला पाहिजे. वरळीतील लढाईत आपण शेवटपर्यंत प्रामाणिकपणे काम केल्याचा दावाही त्यांनी केला. पक्षांतराच्या निर्णयामागे कार्यकर्त्यांचा विचार असल्याचे सांगताना ते म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवून काम करणारी लोकं आहेत. त्यांच्या स्वार्थाचा विचार करून जर कामं होणार असतील, तर मग हा वेगळा विचार आपण का करू नये?

एकनाथ शिंदे यांच्याकडे आकर्षित होण्यामागची कारणे सांगताना अहिर यांनी गिरणी कामगार आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा उल्लेख केला. मुंबईत गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजेत, ही आमची भूमिका होती. पण कोणी प्रतिसाद देत नव्हतं. एकनाथ शिंदे यांनी वेळ दिली आणि मूळ मागणी मान्य करण्याची भूमिका घेतली. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा संदर्भ देताना ते म्हणाले, त्यांनी बैठक स्थगित केली, अधिकाऱ्यांना बोलावलं आणि सांगितलं की नियम असो नसो, यांना 2 हजार रुपयांची वाढ द्या. नाहीतर हे लोकांसमोर जाऊ शकणार नाहीत.

 

याच अनुभवामुळे आपल्याला वेगळा विचार करावा लागला, असे सांगताना अहिर म्हणाले, एक व्यक्ती विरोधी पक्षातला आमदार आहे हे न बघता लोकांसाठी काहीतरी करायची त्यांची मानसिकता असेल, तर आकर्षण होणारच. ईडी किंवा सीबीआयच्या दबावामुळे पक्षांतर केल्याच्या आरोपांवर त्यांनी थेट उत्तर दिले. देवाच्या कृपेने मी अशी काही चुकीची कामं केली नाहीत. तसं असतं तर 2024साली प्रयत्न केला असता, महानगरपालिकेला केला असता. पण मी ती भूमिका घेतली नाही.

निर्णय घेताना भावनिक संघर्ष झाल्याचेही त्यांनी मान्य केले. मलाही दुःख झालं ना. मी तीन दिवस झोपलो नाही. आम्ही काही दगडाचे नाही. पण माझ्यावर अवलंबून राहणारे उपेक्षित समाज, कामगार, लोकं यांना न्याय देता येत नव्हता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीबाबत बोलताना अहिर यांनी डिसकनेक्ट हा शब्द वापरला. ते म्हणाले, एक जिल्हाप्रमुख डायरेक्ट सांगू शकतो का की मी आता उद्धवजींना किंवा आदित्यजींना फोन लावू शकतो? तो संवाद कमी पडतोय. एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना त्यांनी सांगितले, एकनाथ शिंदेजी रात्री-अपरात्री व्हिडिओ कॉलवर बोलायला तयार आहेत आणि निर्णय द्यायलाही तयार आहेत.

वरळी विधानसभा मतदारसंघाबाबत बोलताना सचिन अहिर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, माझं घर तिकडे आहे, माझं राजकारण तिकडे आहे. उद्या पक्षाने जो उमेदवार दिला, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी माझीच राहणार. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात प्रचार कराल का, या प्रश्नावर त्यांनी कोणतीही गोलमोल भूमिका न घेता स्पष्ट उत्तर दिले. मग का नाही होणार? मला तिकडची एक-एक गल्ली माहिती आहे, एक-एक मतदार माहिती आहे, असे म्हणत त्यांनी भविष्यातील राजकीय भूमिकेचे संकेत दिले.

Exit mobile version