Bhutam Bhayam : ‘भूतम भयम्’साठी करण सोनावणे शिकला मालवणी भाषा
Bhutam Bhayam : सोशल मीडियावर आपल्या भन्नाट विनोदांनी आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा ‘ऑरेंज ज्यूस गँग’ मधील करण सोनावणे
Bhutam Bhayam : सोशल मीडियावर आपल्या भन्नाट विनोदांनी आणि सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा ‘ऑरेंज ज्यूस गँग’ मधील करण सोनावणे आता मोठ्या पडद्यावरही तितक्याच दमदार अंदाजात झळकणार आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम्’मध्ये करण एका अस्सल मालवणी तरुणाच्या भूमिकेत दिसणार असून, या भूमिकेला वास्तवदर्शी बनवण्यासाठी त्याने खास मालवणी भाषा शिकण्याची मेहनत घेतली आहे.
करण मुळात मालवणी भाषिक नसतानाही त्याने या भूमिकेसाठी स्वतःवर विशेष मेहनत घेतली. फक्त संवाद पाठ करून न थांबता, मालवणी भाषेची लकब, उच्चार, शब्दफेक आणि बोलण्याची सहज शैली समजून घेण्यासाठी त्याने सातत्याने सराव केला. यासाठी त्याने आपल्या मालवणी मित्रांची, चित्रपटाच्या सेटवरील मालवणी सहकाऱ्यांची मदत घेतली. संवादांमधील प्रत्येक शब्द नैसर्गिक वाटावा, पडद्यावर कुठेही कृत्रिमपणा जाणवू नये, यासाठी त्याने अनेकदा संवादांची उजळणी करत भाषेवर प्रभुत्व मिळवलं.
याबद्दल करण सोनावणे म्हणाला, “या चित्रपटात मी साकारत असलेलं पात्र मालवणी असल्याचं समजलं, तेव्हाच मला जाणवलं की ही भाषा फक्त बोलायची नाही, तर ती जगायची आहे. सुरुवातीला मालवणीतील काही शब्द, त्यांचा उच्चार आणि बोलण्याची लय समजून घेणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. काही शब्द वारंवार चुकायचे, काही वाक्यं म्हणताना मराठीची सवय मध्ये यायची. परंतु मला ही भूमिका कुठेही खोटी वाटू द्यायची नव्हती. त्यामुळे मी माझ्या मालवणी मित्रांशी सतत बोलत राहिलो. सेटवरही जे मालवणी सहकारी होते त्यांचं बोलणं बारकाईने ऐकलं, त्यांना माझे संवाद ऐकवून दुरुस्त करून घेतले. अनेकदा एकाच संवादाचा पुन्हा पुन्हा सराव केला. हळूहळू भाषेची गोडी लागली आणि तिची सहजता अंगी आली.
आज पडद्यावर स्वतःला मालवणीत बोलताना पाहाताना खूप वेगळं आणि समाधानकारक वाटतं. प्रेक्षकांनाही माझा हा प्रयत्न नक्की आवडेल, अशी मला आशा आहे. कलाकार म्हणून प्रत्येक भूमिकेत काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि ‘भूतम भयम्’मुळे मला मालवणी भाषेचं सौंदर्य जवळून अनुभवता आलं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”
‘आधी कल्पना का दिली नाही?’ फडणवीस भेटीनंतर सुनेत्रा पवारांचा तटकरेंना थेट सवाल
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केलं आहे. नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे हे चित्रपटाचे निर्माते असून, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, नील साळेकर आणि करण सोनावणे यांच्यासोबत पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.