Sanjay Jadhav on Manoj Jarange: Refuses to Cancel Farmers’ Melava: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला हा मेळावा तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. यासाठी जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांना फोन करून थेट इशाराही दिला.
‘मेळावा रद्द करा, नाहीतर उपोषण सोडून परभणीत येईन’; संजय जाधवांना जरांगेंनी खडसावलं!
फोनवरून बोलताना जरांगे म्हणाले की, मेळावा तातडीने रद्द करण्यात यावा, अन्यथा आपण उपोषण थांबवून थेट परभणीत येऊ. जरांगे यांच्या या इशाऱ्यानंतर खासदार संजय जाधव यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली असून, कार्यक्रम रद्द होणार नसल्याचे ठामपणे सांगितले आहे.
जरांगे पाटील यांना आपल्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार असल्याचे जाधव यांनी म्हटले. तसेच त्यांच्या भावना आपल्याला मान्य असून, मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत आपल्या भावना वेगळ्या नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगेंच्या 12 व्या उपोषणाचा दुसरा दिवस; लाखो मराठ्यांची अंतरवालीत रेलचेल
मात्र, सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या नियोजित कार्यक्रमाची तयारी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असल्याचे जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज झाली असून मोठ्या संख्येने नागरिकही कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करणे योग्य वाटत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
“जरांगे पाटील यांनी मला याबाबत रात्री जरी सांगितले असते, तरी कार्यक्रम रद्द करण्याचा विचार करता आला असता. पण आता सर्व तयारी पूर्ण झाली आहे आणि लोकही येऊन बसले आहेत. त्यामुळे कार्यक्रम तात्काळ रद्द करणे संयुक्तिक वाटत नाही,” असे जाधव यांनी स्पष्ट केले.
प्रमाणपत्र रद्द करून मराठ्यांच्या उरावर नाचण्याचं काम केलं जातंय, मनोज जरांगेची सरकारवर घणाघाती टीका
जरांगे पाटील यांच्या भावना आणि मागणीचा आपण आदर करत असल्याचे सांगत जाधव यांनी शेवटी स्पष्ट केले की, परिस्थिती काहीही असली तरी परभणीतील नियोजित शेतकरी मेळावा रद्द केला जाणार नाही.
