जरांगेंना पोलिसांची नोटीस; आंदोलन करायचं असेल तर ‘या’ 10 अटींचं पालन करा

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नोटीस; 10 अटी लागू. जरांगेंनीही दिलं उत्तर

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil; Police Issue Notice With 10 Conditions: मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) कालपासून (29 ऑगस्ट) अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे आमरण उपोषणाला सुरुवात करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गणेश गुरले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अर्थात BNSS कलम 168 अंतर्गत ही नोटीस दिली आहे. आंदोलन शांततेत पार पडावे आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी मनोज जरांगेंना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

चारित्र्याच्या संशयातून गर्भवती प्रेयसीची हत्या; शीतपेयातून डांबरगोळ्या दिल्या

जरांगे पाटलांच्या उपोषणासाठी पोलिसांच्या 10 महत्त्वाच्या अटी

1. वाहतुकीला अडथळा नको
उपोषणादरम्यान महामार्ग किंवा इतर रस्त्यांवरील वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.

2. निश्चित ठिकाणीच पार्किंग
आंदोलनासाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था पोलिसांनी निश्चित केलेल्या ठिकाणीच करावी.

3. स्वयंसेवकांची नियुक्ती
वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेसाठी स्वयंसेवक व समन्वयक नियुक्त करून त्यांच्या नावांची यादी पोलिसांकडे सादर करावी.

4. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन
उपोषणादरम्यान ध्वनीप्रदूषणासंदर्भातील कायदे आणि नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

5. जमावबंदीच्या आदेशांचे पालन
जिल्हाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी लागू करण्यात येणाऱ्या जमावबंदीच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे.

6. शस्त्रबंदी आदेशांचे पालन
लागू असलेल्या शस्त्रबंदीच्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी.

7. सामाजिक सलोखा कायम ठेवावा
कोणत्याही जाती, धर्म किंवा समाजाच्या भावना दुखावतील, अशी वक्तव्ये किंवा कृती करू नये.

8. प्रक्षोभक भाषणे टाळावीत
आंदोलनादरम्यान चिथावणीखोर किंवा प्रक्षोभक भाषणे करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये.

9. न्यायालयाच्या निर्देशांचे पालन
सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने विविध प्रकरणांमध्ये दिलेले आदेश व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

10. सुरक्षेची योग्य व्यवस्था करावी
वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवावी. तसेच ज्वलनशील पदार्थांचा वापर टाळून आंदोलनस्थळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

जरांगेंनी नोटीस स्वीकारत दिलं लेखी उत्तर

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांची नोटीस स्वीकारली असून त्याच नोटीसवर आपले लेखी उत्तरही नोंदवले आहे. अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आमरण उपोषण गेल्या तीन वर्षांपासून लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने सुरू असल्याचे त्यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.

‘भारतात एकही मुस्लीम नको’ असे हिंदूला वाटत असेल तर तो हिंदू नाही; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

मात्र, सरकारकडूनच कायद्याचे उल्लंघन करून मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांच्या बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वीही आंदोलकांवर अन्यायकारक आणि अमानुष प्रकार घडल्याचा दावा करत, भविष्यात आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली तर, त्याला सरकार जबाबदार असेल, असे जरांगे यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे.

follow us