निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांपासून मोदींपर्यंत राऊतांचा निशाणा; फडणवीसांच्या ‘राजकारणा’वरही मोठं वक्तव्य

Gyanesh Kumar Controversy : ज्ञानेश कुमार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले.

News Photo   2026 10 05T145600.452

Gyanesh Kumar Controversy

Gyanesh Kumar Controversy : मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार (ECI) यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. ज्ञानेश कुमार हे जनतेच्या मतांवर दरोडा टाकणारे असल्याचा आरोप करत भाजपला निवडणुकांमध्ये फायदा मिळवुन देण्यासाठी ते हातभार लावत असल्याचं राऊत म्हणाले. त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला असला तरी आणखी बरंच काही होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी अमित शाह, सीमा खन्ना यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही राऊत यांनी टीका केली. मोदींच्या राजकीय कारकिर्दीचा अखेरचा काळ सुरु झाला असुन जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत ते सत्तेत असतील की नाही, याबाबत आपण यापुर्वीही बोललो असल्याचा दावा त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊत यांनी निशाणा साधला. फडणवीस सध्या केंद्रातील सर्वोच्च पदावर जाण्यासाठी पाईपलाईनमध्ये असल्याचं बोललं जातं, मात्र त्यांना त्या पाईपलाईनमधुन बाहेर पडावं लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला. त्यांच्या राजकारणाला आता उतरती कळा लागली असल्याचा दावाही त्यांनी केला. मुंबईत काढण्यात आलेल्या गर्जना मोर्चाला मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रतिसाद ही केवळ एका मोर्चाची भावना नसुन देशातील जनतेची भावना असल्याचं राऊत यांनी सांगितलं. मुंबईच्या रस्त्यांवर झालेलं शक्ती प्रदर्शन आणि दिल्लीत सुरु असलेलं शक्ती प्रदर्शन यामधुन हीच भावना दिसत असल्याचं ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाचा ज्ञानेश कुमारांना मोठा दिलासा; निलंबनाला तूर्तास नकार, निवडणूक आयोगाला नोटीस

विद्यार्थ्यांच्या गर्दीतुन गद्दार गद्दार अशा घोषणा ऐकु येणं ही लोकांच्या मनातील भावना असल्याचंही राऊत म्हणाले. ज्यांनी गद्दारी आणि बेईमानी केली त्यांना ठिकठिकाणी जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे, असा दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी एखाद्याला कोट्यवधी रुपये दिले तरी त्यातून प्रतिष्ठा आणि मानसन्मान विकत घेता येत नाही, असं राऊत म्हणाले. पोलिसांच्या गाड्या पुढे मागे लावता येतात, मात्र जनतेच्या मनातील गमावलेला सन्मान परत मिळवता येत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती असताना लोक रस्त्यावर उतरले आहेत, विविध ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत आणि जनता त्रस्त आहे, असं सांगत राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. महाराष्ट्रातील प्रश्न सोडुन दिल्लीमध्ये जाऊन गृहमंत्र्यांच्या लॉनवर बसणं योग्य नाही, अशी टीका त्यांनी केली. दुष्काळी तालुक्यांची केवळ यादी जाहीर करुन दिल्लीच्या फेऱ्या मारणं हा निर्लज्जपणाचा कळस असल्याचा घणाघात राऊत यांनी केला. महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे अमित शाह यांच्या घरात पेईंग गेस्टसारखे राहतात, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला. शिंदे यांना वारंवार अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जावं लागत असल्याचं सांगत राऊत यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्यांवरुनही टीका केली. महाराष्ट्रातील दुष्काळ, भ्रष्टाचार आणि जनतेच्या प्रश्नांवर सरकारने लक्ष द्यावं, अशी मागणी करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. निवडणुक आयोगापासुन राज्य सरकारपर्यंत विविध मुद्यांवरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न राऊत यांनी केला.

Exit mobile version