Gokul Election Results : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीत बदललेल्या कलामुळे महायुतीची चिंता वाढली असून, सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडीवर असलेल्या महायुतीला नंतरच्या मतमोजणीत पिछाडीवर जावं लागलं आहे. सध्याच्या कलानुसार, समविचारी आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर असून महायुतीचे 11 उमेदवार पुढे आहेत. गोकुळच्या 25 जागांपैकी बहुमतासाठी 14 जागांची गरज असल्याने सतेज पाटील यांच्या आघाडीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीला महायुतीचं पारडं जड असल्याचं चित्र होतं. सर्वसाधारण गटातील जागांवर महायुतीचे उमेदवार पुढे होते, तर आरक्षित जागांवर समविचारी आघाडीला आघाडी मिळत होती. मात्र, पुढील फेऱ्यांमध्ये मतांचं चित्र बदललं आणि सतेज पाटील यांच्या आघाडीनं आघाडी घेतली. त्यामुळे महायुतीच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये आघाडीवर असलेल्या शौमिका महाडिक यांच्यासह माजी अध्यक्ष अरुण डेंगळे, विश्वास पाटील आणि नाविद मुश्रीफ हे पिछाडीवर असल्याचं सध्याच्या कलातून दिसत आहे.
गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट ! मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद मुश्रीफ पिछाडीवर
गेल्या दोन महिन्यांपासून सतेज पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळत महायुतीसमोर आव्हान उभं केलं होतं. या निवडणुकीत महायुती आणि समविचारी आघाडी यांच्यात चुरशीची लढत झाली. ठरावधारकांना शपथा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतेज पाटील यांनी महायुतीवर टीका केली होती. त्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देत, मागील निवडणुकीत पाटील यांनीही शपथ घेतल्याची आठवण करून दिली होती. या आरोप-प्रत्यारोपांमुळे गोकुळची निवडणूक अधिक चर्चेत आली.
सध्याच्या कलानुसार, समविचारी आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर असल्याने सतेज पाटील यांना गोकुळमध्ये सत्ता स्थापनेची संधी निर्माण झाली आहे. मात्र, उमेदवारांमधील मतांचं अंतर कमी असल्याने अंतिम फेऱ्यांमध्ये निकाल बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महायुतीची पिछाडी कायम राहते की ती पुन्हा मुसंडी मारते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच गोकुळची सत्ता कोणाच्या हाती जाणार, हे स्पष्ट होईल.
