निवडणुकीत सगळच आपलं गृहीत धरू नका; गोकुळच्या निकालानंतर सतेज पाटलांचा महाडिकांना टोला

गोकुळच्या निवडणुकीनंतर सतेज पाटील यांनी महाडिकांना टोला लगावत बाद मतांमुळं आपल्या आघाडीच्या जागा कमी झाल्याचा दावा केला आहे.

News Photo   2026 10 19T221406.823

Satej Patil

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत साथ (Gokul) देणाऱ्या दूध उत्पादकांचे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी आभार मानले आहेत. सभासद आणि दूध उत्पादकांना गोकुळच्या कारभारात अधिकार मिळावेत, अशी अपेक्षा होती आणि या निकालातून ती पूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं. मतांची एकूण बेरीज पाहिली असती, तर २० जागांपर्यंत निकाल आपल्या बाजूने लागला असता, असा दावाही पाटील यांनी केला. मात्र, मोठ्या प्रमाणात मतं बाद झाल्यामुळे जागांची संख्या कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणुकीच्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

फेरमतमोजणीच्या मुद्द्यावरून सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रगुप्त नरके यांच्यावर टीका केली. फेरमतमोजणीसाठी अर्ज देण्याची गरज नव्हती, असं सांगत त्यांनी निकाल खिलाडूवृत्तीनं स्वीकारायला हवा होता, अशी भूमिका मांडली. या प्रक्रियेत तीन तास वाया गेल्याचंही त्यांनी नमूद केलं. कोल्हापूरमध्ये कोणताही प्रयोग सहज यशस्वी होत नाही, असा टोला लगावत त्यांनी गोकुळ ही कोल्हापूरकरांची अस्मिता असल्याचं सांगितलं. या संस्थेवर स्थानिक सभासद आणि दूध उत्पादकांचाच अधिकार राहायला हवा, असंही ते म्हणाले.

गोकुळमध्ये सतेज पाटलांची खेळी यशस्वी, विद्यमान अध्यक्ष नाविद मुश्रीफांचा पराभव करणारे जायंट किलर कोण?

मतदानातील बाद मतांवर भाष्य करताना पाटील यांनी आणखी एक दावा केला. बोगस मतं कमी झाली असती, तर आपल्या आघाडीच्या किमान सहा ते सात जागा वाढल्या असत्या, असं त्यांनी म्हटलं. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना मतदारांनी नाकारल्याचं सांगत, सगळंच आपलं आहे असं गृहीत धरून निवडणूक लढवता येत नाही, असा टोला त्यांनी महाडिकांना लगावला. गोकुळच्या निकालातून मतदारांनी दिलेला कौल स्वीकारणं महत्त्वाचं असल्याचंही त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं.

गोकुळमधील निवडणुकीनंतर आपल्यासाठी या संस्थेतील राजकारण संपलं असल्याचं सतेज पाटील यांनी जाहीर केलं. आता राजकीय संघर्षाऐवजी दूध उत्पादकांच्या हितासाठी काम करण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सुमारे साडेपाच हजार शेतकऱ्यांसाठी चांगलं काम कसं करता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही पाटील म्हणाले. गोकुळच्या कारभारात सभासद आणि दूध उत्पादकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर पुढील काळात लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Exit mobile version