Series of earthquakes in Maharashtra : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी एका दिवसात तीन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पालघर, नाशिक आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये भूकंपाच्या सौम्य ते मध्यम तीव्रतेच्या धक्क्यांची नोंद झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
सकाळच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा, धुंदलवाडी, चारोटी, वाघाडी, सारणी आदी परिसरात नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अनेकांनी घरातील वस्तू हलल्याचे तसेच काही सेकंद जमिनीला कंप जाणवल्याचे सांगितले. स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती. प्राथमिक माहितीनुसार या धक्क्यांची तीव्रता सुमारे 3.1 रिश्टर स्केल इतकी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र महसूल विभागाकडून यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नव्हती.
याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातही सलग तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के बसले. नाशिकच्या मेरी येथील भूकंपमापन केंद्राच्या माहितीनुसार या भूकंपांचे केंद्र केंद्रापासून सुमारे 45 ते 47 किलोमीटर अंतरावर होते. सकाळी झालेल्या या धक्क्यांची तीव्रता अनुक्रमे 2.2, 2.5 आणि 3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने कोणतीही मोठी हानी झाली नसली तरी ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
भारताचा झिम्बाब्वेवर ९० धावांनी दणदणीत विजय; २-० ने मालिका खिशात, ईशान किशन ‘सामनावीर’
दरम्यान, सायंकाळी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण परिसरात भूकंपाचा आणखी एक धक्का जाणवला. सायंकाळी 6 वाजून 49 मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे केंद्र भूगर्भात सुमारे पाच किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती मिळाली आहे. अचानक झालेल्या धक्क्यांमुळे ग्रामस्थ घराबाहेर धावत आले. काही घरांवरील पत्रे हलू लागली, तर स्वयंपाकघरातील भांडी वाजल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून त्यातच भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण आहे. तज्ज्ञांच्या मते, 3 रिश्टर स्केलच्या आसपासचे भूकंप सामान्यतः सौम्य स्वरूपाचे मानले जातात. अशा धक्क्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता कमी असते. मात्र सतत जाणवणाऱ्या कंपनांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होणे स्वाभाविक असल्याचेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच भूकंपाच्या धक्क्यांदरम्यान सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
