मोठी बातमी! शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल

सोलापूरमधील दुष्काळी दौऱ्यानंतर शरद पवार यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

News Photo   2026 11 02T173037.064

Sharad Pawar Health

Sharad Pawar Health : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कफ आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सोमवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या केल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद पवार यांनी 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी आणि पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावाला भेट दिली होती. या दौऱ्यात त्यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेत त्या सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. या दौऱ्यानंतर सोमवारी त्यांचा पुढील दुष्काळी पाहणी दौरा नियोजित होता.

अमित शहा यांच्या भेटीवरून राष्ट्रवादीत मतभेद असल्याचे वृत्त निराधार; उमेश पाटील यांचा खुलासा

मात्र, सोमवारी होणारा दौरा अचानक रद्द करण्यात आला. सुरुवातीला हवामानातील प्रतिकूल परिस्थिती आणि परिसरात झालेल्या पावसाचे कारण सांगण्यात आले होते. मात्र, शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानेच दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूरहून पुण्यात आल्यानंतर त्यांना कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवत होता. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, दिवाळीनंतर शरद पवार करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार असल्याची माहिती शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी दिली होती. बारामती आणि भिगवण परिसरात झालेल्या पावसामुळे नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. आपण दौऱ्याच्या तयारीसाठी शरद पवार यांची भेट घेतली होती, असेही पाटील यांनी स्पष्ट केले होते. आता पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version