मराठवाडा पदवीधर निवडणुकीत ‘घरभेदी’ कोण?, सतीश चव्हाणांनी सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

Satish Chavan : पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर सतीश चव्हाण यांनी केलेल्या एका दाव्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 02T144136.347

Satish Chavan : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील पराभवावर बोलताना सतीश चव्हाण यांनी हा पराभव नसून घात असल्याचा आरोप केला. “माझा पराभव झालाच नाही, माझा घात झाला आहे. हा घात नेमका कुणी केला, हे त्यांचा घात झाल्यावर कळेल. मात्र, ज्यांनी उघडपणे विरोध केला त्यांच्यापेक्षा सोबत राहून घात करणारे अधिक धक्कादायक आहेत,” असं चव्हाण म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

या प्रकाराची दखल संबंधित पक्षांच्या नेतृत्वाने घेतली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. “त्यांनी दखल घेतली नाही, तर आमच्या पक्ष नेतृत्वाने याची गंभीर दखल घ्यावी. हा जर ट्रेलर असेल, तर विधानसभेला काय होऊ शकतं, याचा अंदाज घेऊन पक्ष नेतृत्वाने वेळीच कारवाई केली पाहिजे,” असं मत सतीश चव्हाण यांनी व्यक्त केलं.

अजितदादा असते तर कुणाची हिंमत नव्हती काही हालचाल करण्याची. पण दादा नसल्याने युतीमध्येही काही गोष्टी घडल्या. अब्दुल सत्तार हे म्हणतात माझ्या पराभवात खारीचा वाटा आहे. मी तर म्हणतो, ज्याचा पराभव होईल त्याच्या पराभवात यांचा सिंहाचा वाटा असतो असं त्यांना कायम वाटतं. विधानसभेला एकमेकांविरोधात लढलो असलो तरी भाजप आमदार प्रशांत बंब याने मला मदत केली. आणि ती मी मान्य करतो.

मी पक्षनेतृत्व सुनेत्रा ताईंना भेटून निवडणुकीत जे काही घडलं त्याचा सविस्तर अहवाल सादर केला आहे. त्यामुळं आता पुढील कारवाई काय करायची ती त्या करतील. दरम्यान, रवीराज साबळे याला जर रील बनवून 20 पदवीधरांची मत मिळत असतील तर मला आता विचार करावा लागेल लोकांची काम करायची की रील बनवायच्या असा टोलाही चव्हाण यांनी यावेळी लगावला. त्याचबरोबर विरोधी विजयी उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचं अभिनंदनही चव्हाण यांनी केलं आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीचा उमेदवारच मैदानात होता म्हटल्यावर त्यांना जोरात प्रचार करणं निवडणुकीचा भागच होता. मी राजकारणात आलो ते अजित पवार आणि आर आर पाटील यांच्यामुळं. पुढ मी शरद पवार साहेबांच्या तालमीत वाढलो. त्यामुळं त्यांच्याबद्दलचा आदर कालही कायम होता, आजही आहे आणि पुढंही राहील. तसंच, पवार साहेबांचं सगळ ओपन असतं, झाकून काही नाही. त्यामुळं त्यांच्या पक्षाने सर्वांनीच प्रचार जोरात केला याबद्दल काही मत नाही असंही ते यावेळी म्हणालेत.

follow us