गोकुळमध्ये सतेज पाटलांची खेळी यशस्वी, विद्यमान अध्यक्ष नाविद मुश्रीफांचा पराभव करणारे जायंट किलर कोण?

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र आणि विद्यमान अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांचा पराभव करत शशिकांत खोत चर्चेत आले आहेत.

News Photo   2026 10 19T210238.262

Shashikant Khot

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत (Gokul) विद्यमान अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांचा झालेला पराभव सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र असलेल्या नाविद यांना पराभव स्वीकारावा लागल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या निकालाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी उमेदवारांची निवड करताना आखलेली रणनीती या निवडणुकीत महत्त्वाची ठरल्याचं चित्र आहे. महायुतीच्या नेत्यांना विजयाची खात्री वाटत असताना नाविद यांचा पराभव झाल्यानं त्यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.

नाविद मुश्रीफ हे इतर मागासवर्गीय गटातून निवडणूक लढवत होते. त्यांच्याविरोधात सतेज पाटील यांनी शशिकांत शामराव खोत यांना मैदानात उतरवलं होतं. महायुतीच्या पॅनेलमधील सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेत्यांनी व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्ष निकालात खोत यांनी नाविद यांचा पराभव केला. गोकुळमध्ये पहिल्यांदाच प्रवेश करणाऱ्या खोत यांनी अनुभवी राजकीय नेत्याच्या कुटुंबातील उमेदवाराला हरवल्यानं त्यांची ‘जायंट किलर’ म्हणून चर्चा होत आहे.

गोकुळच्या निकालात ऐनवेळी ट्विस्ट, तरी सतेज पाटलांनी बाजी मारली, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी समोर

शशिकांत खोत यांचा राजकीय प्रवास ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून सुरू झाला. करवीर तालुक्यातील कणेरीवाडी ग्रामपंचायतीच्या राजकारणातून पुढे आलेल्या खोत यांनी गावचे सरपंच आणि जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं. २०१४ ते २०१७ या काळात ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. याच काळात त्यांनी कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदाची जबाबदारीही सांभाळली. त्यांच्या पत्नीनेही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिलं आहे.

खोत यांची ओळख केवळ राजकीय पदांपुरती मर्यादित नाही. कणेरीवाडीतील त्यांच्या घराशेजारी किराणा मालाचं दुकान असून, हेच दुकान आपलं संपर्क कार्यालय असल्याचं त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान एका व्हिडिओत सांगितलं होतं. आता नाविद मुश्रीफ यांच्या पराभवानंतर खोत यांच्या उमेदवारीची निवड सतेज पाटील यांनी कशी केली, यावरही चर्चा सुरू झाली आहे. गोकुळच्या निवडणुकीत मिळवलेल्या या विजयामुळे खोत यांचं नाव जिल्ह्याच्या राजकीय चर्चेत पुन्हा एकदा ठळकपणे पुढे आलं आहे.

Exit mobile version