Shehzad Poonawalla’s resignation? : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला कळवल्याचे वृत्त आहे. मात्र, यासंदर्भात भाजप किंवा शहजाद पूनावाला यांच्याकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. राजीनाम्याच्या चर्चांदरम्यान शहजाद पूनावाला यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील बायोमध्ये देखील बदल केला आहे. एक्सवरील (पूर्वीचे ट्विटर) त्यांच्या नव्या बायोमध्ये भाजपचा कोणताही उल्लेख नसून त्यांनी स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजीवन अनुयायी असे संबोधले आहे. गुरुवारी त्यांनी हा बदल केला असला तरी त्यामागील कारण स्पष्ट केलेले नाही.
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश
शहजाद पूनावाला यांनी 2017 मध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षीय निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पक्षाशी मतभेद निर्माण झाल्यानंतर काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्त्याची जबाबदारी सोपवली. गेल्या काही वर्षांत ते भाजपचे आक्रमक आणि प्रभावी प्रवक्ते म्हणून ओळखले जाऊ लागले. विविध दूरचित्रवाणी चर्चांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर सातत्याने टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या भूमिकेचे ते जोरदार समर्थन करताना दिसत होते.
अहिल्यानगर हादरले, भांडण कसे करतात ते दाखवतो म्हणत मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांचा घेतला चावा
समाजमाध्यमांवरून मिळाले संकेत
गेल्या काही दिवसांपासून शहजाद पूनावाला यांच्या समाजमाध्यमावरील पोस्टमधून सक्रिय राजकारणातून दूर जाण्याचे संकेत मिळत होते. त्यांनी त्यांच्या जुन्या मुलाखतींचे काही व्हिडीओ पुन्हा शेअर केले होते. विशेष म्हणजे या व्हिडीओंना कोणतेही स्पष्टीकरण किंवा कॅप्शन देण्यात आले नव्हते. जानेवारी 2025 मधील एका व्हिडीओमध्ये ते म्हणताना दिसतात की, राजकीय उद्दिष्टे आणि निवडणूक जिंकण्याची उद्दिष्टे यांची आपण अनेकदा गल्लत करतो. समाजासाठी योगदान देण्यासाठी लोकप्रतिनिधी होणेच आवश्यक नसते. जर मी खासदार झालो नाही, तर माझे समाजासाठीचे योगदान संपते का? प्रत्येकाने देशासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करायला हवा. काही लोक निवडून येऊन योगदान देतात, तर काही जण व्यवस्थेबाहेर राहूनही समाजासाठी काम करतात.
2024 ही माझी शेवटची निवडणूक असेल
दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये शहजाद पूनावाला यांनी सक्रिय राजकारण सोडण्याचा निर्णय यापूर्वीच घेतल्याचे सूचित केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, हरियाणा, बिहार आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या निवडणुकांमुळे मी काही काळ राजकारणात राहिलो. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे, असे मला वाटते. हा व्हिडीओ त्यांनी 28 जून रोजी मी यासाठी दोन वर्षे उशीर केला अशा आशयाच्या टिप्पणीसह शेअर केला होता. त्यानंतर गुरुवारी पुन्हा तोच व्हिडीओ शेअर केल्याने त्यांच्या राजीनाम्याबाबतच्या चर्चांना अधिक बळ मिळाले.
‘तातडीने शाळेवरती शिक्षक पाठवा’; तहसीलदारानंतर आता शिक्षण अधिकाऱ्याचा नंबर, तानाजी सावंत संतापले!
राजकीय वर्तुळात चर्चा
भाजपमधील आक्रमक आणि चर्चित चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहजाद पूनावाला यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यांनी वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला असला तरी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आता भाजपकडून किंवा स्वतः शहजाद पूनावाला यांच्याकडून अधिकृत भूमिका काय मांडली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
