राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळणार आहे. (Thackeray) शिवसेना ठाकरे यांच्या पक्षात आमदारांच्या मोठा फुटीनंतर आता खासदारांनी बंड केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. अगदी दोन दिवसांवरच शिवसेनेचा वर्धापन दिन आलेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसतोय. ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सहा खासदारांपैकी तीन खासदार दिल्लीमध्ये दाखल झाले. त्यानंतर एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरेंचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणार असल्याचं बोललं जातय. या सहा खासदारांमधील पाच खासदार हे उद्धव ठाकरेंच्या 14 जून रोजीच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेले होते. मात्र सहावा खासदार नेमका कोण याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे. या सहाव्या खासदाराचं नाव हे लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रातून उघड होईल असं दिसतय.
ठाकरेंचे तीन खासदार दिल्लीत पोहोचल्यानंतर ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा बळ मिळालं आहे. महत्वाची बाब म्हणजे त्याचवेळी एकनाथ शिंदे स्वतः दिल्लीकडं रवाना झाले आहेत. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि परभणीचे खासदार संजय जाधव हे तिघे चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाले आहेत.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांची आज सकाळी भेट घेणार आहेत. त्यानंतर सहा खासदारांच्या पाठिंब्याचं पत्र ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देणार असल्याची माहिती आहे. एकूण नऊ खासदारांपैकी जर सहा खासदार फुटले तर वेगळा गट निर्माण होऊ शकतो आणि ते खासदार कायदेशीर अडचणीत येणार नाहीत असं हे गणित असल्याची माहिती आहे.
ठाकरेंकडून कारवाईची चाचपणी
ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन खासदार यावर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दिल्लीत गेल्याची माहिती आहे. खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई हे दिल्लीत दाखल झाले असून ते या सर्व घडामोडींवर कायदेशीर सल्ला घेणार असल्याची माहिती आहे. या खासदारावर काय कारवाई करता येईल यासाठी ते माहिती घेणार असल्याची बातमी आहे.
ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावं
अनिल देसाई
अरविंद सावंत
संजय दिना पाटील
राजाभाऊ वाजे
संजय जाधव
संजय देशमुख
नागेश पाटील आष्टीकर
ओमराजे निंबाळकर
भाऊसाहेब वाकचौरे
कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?
संजय जाधव
संजय देशमुख
नागेश पाटील आष्टीकर
ओमराजे निंबाळकर
भाऊसाहेब वाकचौरे
