Someshwar Sugar Factory Election : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर (Someshwar) सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंडखोर पुरुषोत्तम जगताप यांचे नाव न घेता विरोधकांना थेट इशारा दिला आहे. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, एकदा बाहेर पडलात तर कायमचे बाहेर, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. अजित पवार मोठ्या मनाचे होते, मात्र आपण त्यांच्यासारखे नाही, असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदावरूनही सध्या चर्चा सुरू आहे. मात्र निवडणुकीपूर्वी अध्यक्षपदाचा निर्णय झालेला नसून निवडणुकीनंतर सर्व 21 उमेदवारांना विश्वासात घेऊन अध्यक्षाची निवड केली जाईल, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आधीच नाव निश्चित झाल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे.
सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक तिरंगी; दोन्ही राष्ट्रवादीसह भाजपही मैदानात
दरम्यान, सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सध्या तिरंगी लढत होत आहे. अजितदादा पवार समर्थक पॅनेलच्या विरोधात पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पॅनेलही निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यामुळे पवार कुटुंबाशी संबंधित तीन गटांमधील ही लढत आता चांगलीच रंगली आहे.
निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने तिन्ही पॅनेलकडून गावोगावी प्रचार, बैठका आणि मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला जात आहे. सुनेत्रा पवार आणि जय पवार अजितदादा पवार समर्थक पॅनेलसाठी प्रचार करत आहेत, तर युगेंद्र पवार यांनीही प्रचाराचा वेग वाढवला आहे. पुरुषोत्तम जगताप आणि माजी आमदार संजय जगताप हेही आपल्या पॅनेलसाठी जोरदार प्रचार करत आहेत.
सोमेश्वर कारखान्याच्या 21 जागांसाठी 11 ऑक्टोबरला मतदान होणार असून 12 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदानाची तारीख जवळ येत असताना प्रचारातील आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे.
