Sunil Shelke–Sunil Gujar dispute reaches police station : बोगस ओळखपत्र वापरून नागरिकांना नाहक त्रास देणे, धमकावणे आणि पैशांची मागणी करणे, असे गंभीर आरोप करत मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी पिंपळोली, ता. मावळ, जि. पुणे येथील सुनील रघुनाथ गुजर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. तर दुसरीकडे सुनील गुजर यांनीही आपल्याला आमदार शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण आणि धमकावल्याची तक्रार बंडगार्डन पोलिसात केली आहे.
आमदार शेळके यांनी बंडगार्डन पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, सुनील गुजर हे स्वतःला महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकार कार्यकर्ते असल्याचे सांगून कथित बोगस ओळखपत्राचा वापर करत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही प्राप्त झाल्या आहेत. नागरिकांना धमकावून पैशांची मागणी केली जात असल्याचाही आरोप अर्जात करण्यात आला आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार 16 ऑक्टोबर 2026 रोजी ते आपल्या मतदारसंघातील शासकीय कामकाजासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी सुनील गुजर यांनी त्यांच्या वैयक्तिक, संवेदनशील आणि व्यावसायिक तसेच खासगी माहिती मिळवण्यासाठी इतर व्यक्तींच्या नावाने अर्ज करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिवाय, संबंधित व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन आढळून आल्याचा दावाही अर्जात करण्यात आला आहे. या बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदेंचा भाजपला धक्का, अधिकृत पाठिंब्याची घोषणा केल्याने खळबळ
अर्जात पुढे म्हटले की, सुनील गुजर हे गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या कार्यालयात आणि नियोजित कार्यक्रमांच्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता म्हणून येऊन आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे. आपली माहिती राजकीय विरोधकांसह गुन्हेगारांपर्यंत पोहोचवली जात असल्याची माहिती यापूर्वी मिळाल्याचेही त्यांनी अर्जात नमूद केले असून रामदास काकडे यांच्या सांगण्यावरून सुनील गुजर हे सर्व काही करत असल्याचे समजल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच गुजर यांच्या दोन्ही मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावेत आणि दोषी आढळल्यास तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आमदार शेळके यांनी बंडगार्डन पोलिसांकडे केली आहे.
दुसरीकडे सुनील गुजर यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले की, माझ्या वकिलाने सांगितलेलं काम मी करत होतो. तेव्हा कलेक्टर कार्यालयात आमदार शेळके आपल्या २०-२५ कार्यकर्त्यांसोबत आले तेव्हा माझी बॅग हिसकावून घेतली त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझे हात पकडले तेव्हा शेळके यांनी शिवीगाळ करून आमदार मारहाण केली तसेच तुझा किशोर आवारे सारखा कार्यक्रम करू,अशी धमकीही दिली असल्याचेही गुजर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकारचे मोठे पाऊल, चौकशी आयोग अधिकृतपणे स्थापन
तर याप्रकरणी बोलताना रामदास काकडे यांचे पुत्र रणजित म्हणाले की, “काकडे परिवाराला आरोप करायला मिळावेत म्हणुन आम्ही भ्रष्टाचार करतोय, असे म्हणायला देखील आमदार शेळके साहेब कमी करणार नाहीत. आमदार पदाची प्रतिष्ठा न बाळगता कोणतीही परिस्थिती स्वतःच्या फायद्यासाठी कशी वापरायची ही चुकीची शिकवण ते देत आहेत.” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलिस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आमदार शेळके यांनी स्वतः याबाबत तक्रार केल्याने आणि त्यांच्या विरोधात गंभीर आरोप करत गुजर यांचीही पोलिसात तक्रार आल्याने याची चर्चा मावळ परिसरात जोरात सुरु झाली आहे.
