दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी… सुप्रिया सुळे भावूक, अजित पवारांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा

अजितदादांच्या निधनानंतरची ही पहिलीच दिवाळी आणि पहिली भाऊबीज असल्याने पवार कुटुंबासाठी यंदाचा सण अत्यंत भावनिक ठरला आहे.

Untitled Design   2026 11 11T101959.296

Untitled Design 2026 11 11T101959.296

Supriya Sule’s emotional post remembering Ajitdada : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अजितदादांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने पवार कुटुंबीयांसह राज्यातील असंख्य कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. अजितदादांच्या निधनानंतरची ही पहिलीच दिवाळी आणि पहिली भाऊबीज असल्याने पवार कुटुंबासाठी यंदाचा सण अत्यंत भावनिक ठरला आहे. यंदा दुःखाच्या सावटाखाली पवार कुटुंबीयांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला होता.

दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने एकत्र येणारा पवार परिवार यंदा मात्र एकत्र दिसला नाही. कुटुंबातील काही सदस्य मुंबईत, काही जण जनसेवेच्या दौऱ्यावर, तर काही सदस्य बारामतीमध्ये होते. दरम्यान, भाऊबीजेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या आठवणीत एक अत्यंत भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी दिवाळी आणि भाऊबीजेच्या जुन्या कौटुंबिक क्षणांचा व्हिडीओही शेअर केला आहे.

 

सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमधून अजित पवार यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले की, दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली.

मुंबईत सिलिंडर स्फोटांची मालिका, प्रतीक्षानगरमध्ये भीषण आग, चार घरं जळून खाक, अग्निशमन दलाचा जवान जखमी

पुढे जुन्या कौटुंबिक आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, आपलं एकत्र येणं, गप्पा, हसणं… आम्हा बहिणींच्या घोळक्यात हरखून गेलेला तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस. तेव्हा अगदी सहज वाटणारे ते क्षण आज किती मोलाचे वाटतात. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील.

सुप्रिया सुळे यांच्या या शब्दांमधून भावाच्या जाण्याचे दुःख आणि त्यांच्यासोबतच्या आठवणींची ओढ स्पष्टपणे जाणवते. भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळण्याची परंपरा असताना यंदा अजितदादा आपल्यात नसल्याची खंत त्यांच्या पोस्टमधून व्यक्त झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पवार कुटुंबातील दिवाळी आणि भाऊबीजेचे जुने आनंदी क्षण पाहायला मिळत आहेत. कुटुंबातील सदस्यांचे एकत्र येणे, गप्पा, हसणे आणि सण साजरा करण्याचे ते क्षण या व्हिडीओच्या माध्यमातून पुन्हा समोर आले आहेत.

दरवर्षी आनंदाने आणि उत्साहाने साजरी होणारी दिवाळी यंदा अजितदादांच्या अनुपस्थितीत पवार कुटुंबासाठी वेदनादायी ठरली आहे. सुप्रिया सुळे यांची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून, अजितदादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने अनेक कार्यकर्ते आणि नागरिकही भावूक झाले आहेत. भावाच्या आठवणी, बहिणींचे प्रेम आणि कुटुंबातील जुन्या क्षणांची आठवण करून देणारी सुप्रिया सुळे यांची ही पोस्ट अनेकांच्या मनाला स्पर्श करणारी ठरली आहे.

Exit mobile version