Sushma Andhare Melawa Speech : ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात नेत्या सुषमा अंधारे (Thackeray) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत शेतकरी, दुष्काळ आणि सत्ताधाऱ्यांच्या खर्चाच्या मुद्द्यांवरून निशाणा साधला. “मिंधेचे दलाल चारा छावण्यांमध्येही दलाली सुरू करतील, त्यामुळे आम्हाला चारा द्या,” असा टोला त्यांनी लगावला. आमच्यासमोर जगण्या-मरण्याची लढाई आहे, तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खुर्चीसाठी संघर्ष सुरू असल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यातील शिक्षक निवडणुकीचा संदर्भ देत त्यांनी शिंदेंवर टीका केली, तसेच सरकार जनतेला काटकसर करायला सांगत असताना दुसरीकडे कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचा आरोप केला.
पोलीस भरती आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरही अंधारे यांनी गंभीर आरोप केले. ६०० पोलीस उपनिरीक्षकांची प्रत्येकी १८ लाख रुपये घेऊन भरती करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सरकारवर टीका केली की आपल्याला अर्बन नक्षल ठरवलं जातं, असं सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. गोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशी यांनी अंडरवर्ल्डविरोधात काम केलं, मात्र सध्याचं भाजप सरकार सत्तेसाठी अंडरवर्ल्डचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Jyoti Waghmare : ठाकरेंचा दसरा मेळावा सत्तापिपासूंचा ; ज्योती वाघमारेंचा उबाठावर हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्याचा उल्लेख करत अंधारे यांनी सरकारच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. “वर्षभरात काय केलं, देवेंद्रजी? मीनाक्षी शिंदे यांचं काय केलं? तुमचे पोलीस त्यांना सुरक्षा देत आहेत,” असा सवाल त्यांनी केला. तसेच, “तुम्ही आमच्या नोटा मोजत असाल, तर तुम्हाला आमची मतंही मोजावी लागतील,” असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. बिष्णोई गँग देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत असून, गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
लॉरेन्स बिष्णोई गुजरातमधील साबरमती तुरुंगात असूनही टोळी चालवत असल्याचा मुद्दा उपस्थित करत अंधारे यांनी भाजपच्या सत्तेतील राज्यांतील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अन्वर बिष्णोई दिल्लीत असल्याचा उल्लेख करत त्यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवरही टीका केली. दुसरीकडे, शेतकरी शेताच्या बांधावर संकटांचा सामना करत आहे, तर त्याची मुलं शहरातही अडचणींना तोंड देत आहेत, असं त्या म्हणाल्या. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे तरुणांचं नुकसान होत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला धारेवर धरलं. शिवसेनेसाठी संघर्ष करताना बलिदान द्यावं लागलं, तरी अभिमान वाटेल; त्यामुळे लढा सुरू ठेवला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
