ठाकरे-शिंदेंच्या दसरा मेळाव्यात आज राजकीय संघर्ष; कोण कुणाला देणार प्रत्युत्तर?

Uddhav Thackeray Eknath Shinde Dasara Melava: दादरच्या शिवाजी पार्कवर ठाकरेंचा, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंचा दसरा मेळावा होणार.

Uddhav Thackeray Eknath Shinde Dasara Melava

Uddhav Thackeray Eknath Shinde Dasara Melava: मुंबईत आज दसऱ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे स्वतंत्र मेळावे होणार आहेत. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर उद्धव ठाकरे यांचा, तर गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांचा मेळावा पार पडेल. दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू असून, आजच्या भाषणांतून एकमेकांवर कोणते आरोप होणार आणि त्याला काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वतंत्र ताकद दाखवली जाते. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार आणि राजकीय वारसा यावर दोन्ही बाजूंकडून दावा केला जातो.

कर्जमाफीच्या यादीत नाव नाही, मुलीची फी माफ नाही; शेतकऱ्याने अश्रू ढाळत संपवलं जीवन, रोहित पवारांचा सरकारवर संताप!

उद्धव ठाकरे आज कोणावर निशाणा साधणार?

उद्धव ठाकरे यांच्या भाषणात केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत काय भूमिका मांडली जाते, याची उत्सुकता आहे. SIR आणि निवडणूक प्रक्रियेवरून विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे आज कोणते मुद्दे मांडतात, याकडे लक्ष असेल.

…तर पदवीधर आणि शिक्षकांची पदवी तपासावी लागेल; मतं बाद होण्यावरून फडणवीसांचा मिश्किल टिपण्णी

मेळाव्याआधी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोशल मीडियावर काही टीझर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यातून मेळाव्याची वातावरण निर्मिती करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी मुंबई पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताबदलाची गरज असल्याची भूमिका मांडली होती. मतचोरीच्या आरोपांचा उल्लेख करत त्यांनी सध्याची सत्ताव्यवस्था बदलण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाही केली होती. त्यामुळे आजच्या मेळाव्यात ठाकरे या मुद्द्यांवर पुन्हा बोलणार का आणि सत्ताधाऱ्यांना काय उत्तर देणार, याकडे लक्ष असेल.

शिंदे ठाकरेंच्या टीकेला काय उत्तर देणार?

दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या भाषणातून उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना कशा प्रकारे प्रत्युत्तर दिले जाते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेनेतून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर शिंदे यांनी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यातून ते आपल्या नेतृत्वाची आणि पक्षाच्या भूमिकेची मांडणी कशी करतात, हे पाहावे लागेल.

निवडणुकीत सगळच आपलं गृहीत धरू नका; गोकुळच्या निकालानंतर सतेज पाटलांचा महाडिकांना टोला

राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना कार्यकर्त्यांनी मुंबईत गर्दी करण्याऐवजी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन शिंदे यांनी यापूर्वी केले होते. त्यामुळे आजच्या भाषणात दुष्काळ, शेतकरी मदत आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर ते काय बोलतात, याचीही उत्सुकता आहे.

गर्दीपेक्षा भाषणांतील मुद्द्यांची चर्चा

दोन्ही मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. दोन्ही गटांकडून आपापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ वातावरण तयार केले जात आहे. मात्र, या मेळाव्यांमध्ये कोणाच्या सभेला अधिक गर्दी होते, यापेक्षा दोन्ही नेते कोणते राजकीय मुद्दे मांडतात आणि एकमेकांच्या आरोपांना कसे प्रत्युत्तर देतात, याला अधिक महत्त्व असेल. ठाकरे आणि शिंदे यांच्यातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आजचे दोन्ही दसरा मेळावे राज्याच्या राजकारणातील पुढील घडामोडींसाठी महत्त्वाचे ठरू शकतात.

follow us