कर्जमाफीच्या यादीत नाव नाही, मुलीची फी माफ नाही; शेतकऱ्याने अश्रू ढाळत संपवलं जीवन, रोहित पवारांचा सरकारवर संताप!
Nanded Farmer Suicide Rohit Pawar Criticises: नांदेड जिल्ह्यातील शंकर क्षीरसागर या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली.
Nanded Farmer Suicide Rohit Pawar Criticises Maharashtra Government: राज्यात दुष्काळ (Maharashtra Drought) आणि पाणीटंचाईमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशातच नांदेड जिल्ह्यातील शंकर क्षीरसागर या शेतकऱ्याने आपले जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. कर्जमाफीच्या (Loan Waiver) यादीत नाव नसल्याने आणि मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी फी माफी मिळत नसल्याने त्यांनी आपल्या अडचणी मांडल्या होत्या. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ बनवून आपली व्यथा सांगितली. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
निवडणुकीत सगळच आपलं गृहीत धरू नका; गोकुळच्या निकालानंतर सतेज पाटलांचा महाडिकांना टोला
आत्महत्येपूर्वी व्हिडीओतून मांडली व्यथा
शंकर क्षीरसागर यांनी व्हिडीओमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून आपली व्यथा मांडली होती. तीन वेळा कर्जमाफीची प्रक्रिया होऊनही आपलं नाव यादीत आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या मृत्यूप्रकरणी गांभीर्याने चौकशी व्हावी, अशी विनंतीही त्यांनी केली होती. त्यांची मुलगी शिवानी शंकर क्षीरसागर वैद्यकीय शिक्षण घेत असून, अर्ज करूनही तिला फी माफी मिळाली नसल्याचं त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं. हा व्हिडीओ शूट केल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
रोहित पवारांचा सरकारला सवाल
या घटनेचा व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरलं. शंकर क्षीरसागर यांचा व्हिडीओ मन हेलावून टाकणारा असल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. शेतकऱ्याची आर्त हाक सरकारपर्यंत पोहोचेल, पण ती सरकारच्या मनाला भिडेल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नांदेड जिल्ह्यातील शंकर क्षीरसागर या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी केलेला हा व्हिडिओ मन सुन्न करणारा आहे.. मुख्यमंत्री महोदय या शेतकऱ्याची आर्त हाक कदाचित तुमच्या कानापर्यंत पोचेल पण मनापर्यंत पोचेल की नाही हा अजूनही प्रश्नच आहे. परवा पत्रकार परिषदेत दुष्काळाचं प्रेझेंटेशन करताना ‘शिवार हेल्पलाईन’चे विनायक हेगाना यांनी वर्तवलेली भीती आणि आज पुढं आलेलं वास्तव, हे चिंता वाढवणारं आहे.
मायबाप सरकार शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर अहंकार बाजूला ठेवून आमच्यासारख्या विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांवरही सकारात्मक विचार करा. अन्यथा बळीराजा मरत राहील आणि त्याच्या सरणावर सरकारच्या इज्जतीची रोज राख होत जाईल..! सरकारने अजूनही सुधरावं आणि शंकर क्षीरसागर या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी आणि त्यांची आर्त हाक ते गेल्यानंतर तरी ऐकावी. आम्हीही तुम्हाला कित्येकदा हेच ओरडून सांगतोय.
शंकर क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @bharanemamaNCP
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 19, 2026
दुष्काळाच्या परिस्थितीबाबत याआधी व्यक्त करण्यात आलेली चिंता आणि आता समोर आलेली ही घटना गंभीर असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं. शेतकऱ्यांचे प्राण वाचवायचे असतील, तर सरकारने अहंकार बाजूला ठेवून विरोधकांनी मांडलेल्या प्रश्नांचाही गांभीर्याने विचार करावा, असं आवाहन त्यांनी केलं.
पाच हजारांच्या मदतीवरूनही सरकारवर टीका
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने नुकतीच पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, वाढत्या आर्थिक अडचणींच्या तुलनेत ही मदत अपुरी असल्याची टीका होत आहे. पाच हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्नही शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफांना मोठा धक्का! गोकुळ निवडणुकीत मुलगा नविद यांचा 69 मतांनी पराभव
शंकर क्षीरसागर यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आवाहन केलं. तसेच, क्षीरसागर यांना श्रद्धांजली अर्पण केली.