The intensity of the rainfall has subsided in the state : राज्यातील बहुतांश भागात पावसाने सध्या विश्रांती घेतली असून अनेक ठिकाणी कोरड्या हवामानाचा अनुभव येत आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक भागांत ऑक्टोबर हिटचा प्रभाव देखील जाणवू लागला आहे.
भारतीय हवामान विभागाने 7 ऑक्टोबरला जारी केलेल्या अंदाजानुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसून हवामान विभागाने हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये किमान 19 अंश तर कमल 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होऊ शकते. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर तसेच पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरात पावसाची शक्यता नसल्याने वातावरण कोरडे राहणार आहे. मात्र, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आठ तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई, राहुल गांधी म्हणाले, एकाही देशद्रोहीला सोडलं जाणार नाही
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागांसाठी कोणताही हवामान इशारा जारी करण्यात आलेला नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 21 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठीही कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. अकोला आणि अमरावतीमध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
मात्र, गडचिरोली जिल्ह्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. येथे मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकूणच, राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी स्थानिक पातळीवर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता कायम आहे.
