नगर परिषद आणि नगर पंचायतिंचा गुलाल हवेत विरला नाही, तोपर्यंतच राज्यात होणाऱ्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निवडणुकांचा वार राज्यात वाहत आहे. (Mumbai) आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. मुंबई महानगरपालिकेवर कोण सत्तेचा झेंडा फडकवणार यांची राज्याला उत्सुकता लागली आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी एकत्र लढणार की नगरपालिकांप्रमाणे स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
प्रमुख पक्षांचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे आज पहिल्या दिवशी राजकीय पक्षांच्या अर्जांची शक्यता कमी आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. आजपासून 23 डिसेंबर ते ३० तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होईल. 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक चिन्हांचं वाटप, अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारीला प्रसिद्ध होईल. सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेत तब्बल 11 लाख दुबार मतदार!; निवडणूक आयोगाचा खुलासा
मुंबई महानगर पालिकेवर सत्ता कायम ठेवण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर काही करून सत्ता मिळवायचीच असा चंग भाजपनेही बांधला आहे. त्यामुळे ही लढाई ठाकरे विरुद्ध भाजप अशीच होईल असं सध्याचं तरी चित्र आहे. राज्यात कुठेही महायुती झाली नाही तरीही मुंबईत ठाकरे बंधूंचे आव्हान लक्षात घेता भाजप शिवसेना शिंदे गटाबरोबर युती करणार हे निश्चित. तसंच, विरोधी महाविकास आघाडीत एकवाक्यता दिसत नाही. मुंबईत काँग्रेसने स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. नगरपालिका निकालानंतर महाविकास आघाडीने एकत्र लढण्याबाबत विचार केला पाहिजे, अशी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये भावना तयार झाली आहे.
ठाकरेंच्या युतीची घोषणा?
ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची आज घोषणा होणार का याकडं लक्ष लागलंय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवडीतील 2 जागा ठाकरेंच्या सेनेला, तर एक जागा मनसेला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर भांडूपच्या वॅार्ड क्रमांक 114 वरून शिवसेना ठाकरे आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. ज्या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना जागा हव्या आहे तिथे रस्सीखेच सुरू आहे, आज तोडगा निघतो का हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
आजपासून सुरू झालेली प्रक्रिया
नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
मतदान- 15 जानेवारी 2026
मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026
