मोठी बातमी! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी मुंबई पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई.

News Photo   2026 10 10T162852.281

Tushar Gandhi Detained

Tushar Gandhi Detained : मुंबईत महात्मा गांधी यांचे पणतू आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पक्षाच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तुषार गांधी यांनी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वाजता निदर्शनं करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आंदोलनासाठी परवानगी नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर वांद्रे परिसरातून तुषार गांधी यांना ताब्यात घेऊन डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.

तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे डी. एन. नगर पोलीस ठाण्यात जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित केलेल्या निदर्शनांपूर्वीच तुषार गांधी यांना ताब्यात घेण्यात आल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. दरम्यान, तुषार गांधी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

तुषार गांधी यांच्यासह अनेक संघटनांनी आज दुपारी 2 ते 5 या वेळेत मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्यांना परवानगी देण्यात आली नाही. तुषार गांधी आणि त्यांचे समर्थक ऑगस्ट क्रांती मैदानावर पोहोचण्यापूर्वीच त्यांना नॅशनल कॉलेज येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलनासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती, असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. दुसरीकडे, मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.

दिल्लीत सीजेपीच्या नेत्यांना अटक

दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांच्यासह सौरभ दास, आशुतोष रांका आणि इतर काही नेत्यांना विमानातूनच ताब्यात घेतलं. या नेत्यांना जंतर-मंतरवर जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यांना नेमकं कुठे नेण्यात आलं आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या हजारो लोकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याशिवाय, जंतर-मंतरचा संपूर्ण परिसर पोलिस छावणीत रूपांतरित करण्यात आला आहे. तसंच, दिल्ली पोलिसांनी शुक्रवारपासूनच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली होती. त्याचे परिणाम आज सकाळपासून दिसून येत आहेत. दिल्लीत 57 मेट्रो स्थानकं बंद करण्यात आली असून, अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version