Veteran actor Mushtaq Khan passes away : बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या 56 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून ते यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वासह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. मुश्ताक खान यांनी 1980 च्या दशकात चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.
‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ या चित्रपटातील छोट्या भूमिकेतून त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल है के मानता नहीं’ आणि 1993 मधील ‘हम हैं राही प्यार के’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. विनोदी भूमिकांसोबतच गंभीर आणि सहाय्यक भूमिकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.
एसआयआर प्रकरणानंतर मोठी राजकीय घडामोड, ज्ञानेश कुमारांविरोधात ‘महाभियोग’ प्रस्तावाची तयारी
‘वेलकम’ आणि ‘वेलकम बॅक’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. याशिवाय ‘गदर: एक प्रेम कथा’, ‘गदर 2’, ‘स्त्री 2’, ‘क्रांतिवीर’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. चित्रपटांसोबतच छोट्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘वागले की दुनिया’, ‘भारत एक खोज’ आणि ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ यांसारख्या मालिकांमध्येही ते झळकले होते. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम’ चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. या चित्रपटातील त्यांचा “मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहुत बड़ा खिलाड़ी था…” हा संवाद प्रचंड लोकप्रिय झाला.
वर्षानुवर्षे हा संवाद सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून चर्चेत राहिला आणि नव्या पिढीतील प्रेक्षकांमध्येही मुश्ताक खान यांना वेगळी ओळख मिळवून देणारा ठरला. आपल्या सहज अभिनयशैलीने, अचूक विनोदी टायमिंगने आणि विविध व्यक्तिरेखांमधून मुश्ताक खान यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील सहकलाकारांसह चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मुश्ताक खान यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वाने एक अनुभवी आणि अष्टपैलू कलाकार गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
