भाषातज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे पुण्यात निधन; वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dr. Yasmin Shaikh passes away त्या 101 वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना या दोन मुली आहेत.

Linguist Dr. Yasmin Shaikh Passes Away

Linguist Dr. Yasmin Shaikh passes away in Pune; breathes her last at age of one hundred one : मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात दीर्घकाळ मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ अभ्यासक, लेखिका आणि प्राध्यापिका यास्मिन शेख यांचे आज, 24 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्या 101 वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना या दोन मुली आहेत.

झटपट पैशाच्या नादात GenZ चा गेम ओव्हर; F&O मधील नुकसानाची धक्कादायक आकडेवारी

यास्मिन शेख यांचे जन्मनाव जेरुषा रुबेन होते. त्यांचा जन्म २१ जून १९२५ रोजी झाला. जन्माने त्या ज्यू धर्मीय कुटुंबातील होत्या. पुढे अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला. विवाहानंतर त्यांचे नाव यास्मिन शेख झाले. मात्र विवाहानंतरही त्यांनी आपला धर्म बदलला नव्हता.

मराठी भाषा आणि व्याकरणाच्या अभ्यासात मोठे योगदान

प्रा. यास्मिन शेख यांनी आपले संपूर्ण आयुष्य मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या अभ्यासाला वाहून घेतले. पुण्यातील एस.पी. महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले. मराठी विषयात त्यांना विशेष रस होता. प्रा. एस. एम. माटे आणि प्रा. के. एन. वातवे यांसारख्या शिक्षकांचा त्यांच्या भाषाविषयक जडणघडणीवर मोठा प्रभाव पडला. त्यानंतर त्यांनी एम.ए.ची पदवी मिळवली. वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे बालपणात त्यांना विविध ठिकाणी राहण्याची संधी मिळाली. या काळातच त्यांच्यात शिक्षणाची आणि भाषेच्या अभ्यासाची आवड निर्माण झाली.

महाविद्यालयीन अध्यापनापासून स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनापर्यंत

1949 मध्ये अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी विवाह केल्यानंतर त्या यास्मिन शेख या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांच्या अध्यापन कारकिर्दीची सुरुवात औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातून झाली. त्यानंतर मुंबईतील शीव येथील एसआयईएस महाविद्यालयात त्यांनी मराठीच्या प्राध्यापिका म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावली.

या काळात पु. भागवत आणि विंदा करंदीकर यांसारख्या साहित्यिकांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्या महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुखपदावरही कार्यरत होत्या. निवृत्तीनंतरही भाषेच्या अभ्यासाशी त्यांचा संबंध कायम राहिला. त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच IAS आणि UPSC परीक्षार्थींना मराठी व्याकरण आणि भाषाशास्त्राचे मार्गदर्शन केले.

‘व्याकरण सल्लागार’ म्हणूनही वेगळी ओळख

मराठी लेखनातील शुद्धता, व्याकरण आणि योग्य शब्दप्रयोग यासाठी प्रा. यास्मिन शेख यांचे नाव आदराने घेतले जात होते. ‘अंतर्नाद’ मासिकाशी त्यांचा दीर्घकाळ संबंध होता. या मासिकाच्या ‘व्याकरण सल्लागार’ म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लेखनातील व्याकरणाच्या चुका, शब्दांची निवड किंवा भाषेचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक लेखक आणि वाचक त्यांच्याशी संपर्क साधत असत.

मराठी भाषेवर त्यांचे अपार प्रेम होते. मात्र भाषेकडे पाहताना त्यांनी कधीही संकुचित भूमिका घेतली नाही. प्रमाण मराठीसोबतच बोलीभाषांचे महत्त्व आणि भाषेतील विविधता यांचाही त्यांनी अभ्यासपूर्ण विचार केला. वयाच्या शंभराव्या वर्षात केलेल्या भाषणातही त्यांनी व्याकरण आणि भाषाशास्त्र यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला होता. भाषेचा अभ्यास हा केवळ नियमांपुरता मर्यादित नसून तिच्या प्रवाहाचा आणि विविध रूपांचा विचार करणारा असावा, अशी त्यांची भूमिका होती.

त्यांची गाजलेली पुस्तके

प्रा. यास्मिन शेख यांनी मराठी भाषा आणि व्याकरणाच्या अभ्यासासाठी अनेक महत्त्वाची पुस्तके लिहिली. त्यापैकी प्रमुख पुस्तके अशी आहेत. मराठी लेखन मार्गदर्शिका, मराठी शब्दलेखन कोश, सुगम मराठी व्याकरण कोश, त्यांच्या लेखनामुळे मराठी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षक, लेखक आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मोठी मदत झाली. मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या प्रा. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषा-अभ्यासाच्या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

follow us