Vidyanand Bapat makes a major revelation regarding atheism : गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर डीजेविरोधात भूमिका घेतल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आहेत. विद्यानंद बापट यांनी एबीपी माझाच्या ‘कॉफी विथ कौशिक’ या कार्यक्रमात विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना नास्तिकतेकडे त्यांचा प्रवास कसा झाला आणि ते नेमके कधी नास्तिक झाले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बापट यांनी आपल्या बालपणापासून वैचारिक जडणघडणीपर्यंतचा प्रवास सांगितला.
आपलं कुटुंब नास्तिक नव्हतं आणि लहानपणी घरात धार्मिक सण-उत्सव साजरे होत असल्याचं बापट यांनी सांगितलं. विशेषतः कोकणात गणेशोत्सवाला असलेलं महत्त्व सांगताना ते म्हणाले की, कोकणात तर दिवाळीपेक्षा मोठा तिकडे गणेशोत्सव असतो. पुण्यातूनच नाही मुंबईतून पण चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात येतात. कोकणात होळी म्हणजेच शिमगाही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसेच भाद्रपदातील गणेशोत्सवासोबत माघ महिन्यात गणेश जयंतीचा उत्सवही साजरा होतो, असं त्यांनी सांगितलं.
लहानपणी आपल्या घरीही गणेशोत्सव होत असल्याचं सांगताना बापट यांनी रिचर्ड डॉकिन्स आणि क्रिस्टोफर हिचेन्स यांचाही संदर्भ दिला. लहानपणी आमच्या घरी गणेशोत्सव होत असे. कोकणात घरी गणपती तर बसायचा, तिकडे घरोघरी बसतातच, असं ते म्हणाले. त्यामुळे आपली कौटुंबिक पार्श्वभूमी सुरुवातीपासून नास्तिकतेची नव्हती, हे त्यांनी स्पष्ट केलं. कुणाच्याच घरचे नास्तिक नसतात सहसा, रेअरली असं असतं. आमच्या घरचे तर नक्कीच नास्तिक नव्हते. आता मी वेगळा झालोय, माझं वय वाढलं, मी आर्थिकदृष्ट्या वेगळा झालेलो आहे. त्यामुळे माझं ते व्यक्तिस्वातंत्र्य आहे. घरच्यांना ते मान्य आहे, असं विद्यानंद बापट यांनी सांगितलं.
समोरून टिंगल, शिव्या; तरी आमचे मंत्री पाय धरायला जातात; जरांगेंवरून भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर
नास्तिकतेकडे वळण्याची प्रक्रिया मात्र लहान वयातच सुरू झाल्याचं बापट यांनी म्हटलं. बाह्य जगातील गोष्टी पाहताना त्याबद्दल प्रश्न पडू लागले आणि त्यातून स्वतःची मतं तयार होत गेली. बाराव्या-तेराव्या वर्षापासून मला कळत होतं. मिरची-लिंबू वगैरे वाहनांना बांधलेलं असतं, पण त्या वाहनांचेही एक्सिडेंट होतात. दुकानावर ते बांधतात तरी त्याचा धंदा चालत नाही असं होत असतं. चालत असलेले व्यवसाय बंद पडतात. म्हणजे त्याने काही फरकच पडत नाही, हे लहानपणापासून कळत होतं, असं बापट म्हणाले.
मात्र वैचारिक आणि सैद्धांतिक पातळीवर नास्तिकतेबद्दल स्पष्टता येण्यासाठी लेखक रिचर्ड डॉकिन्स यांचं ‘द गॉड डिल्यूझन’ हे पुस्तक महत्त्वाचं ठरल्याचं त्यांनी सांगितलं. हे पुस्तक वाचल्यानंतर नास्तिकतेविषयी आपल्याला संकल्पनात्मक स्पष्टता मिळाली, असं बापट म्हणाले. याशिवाय इतर लेखकांच्या पुस्तकांचाही आपल्या विचारांवर प्रभाव पडल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यामुळे कोणीही समोर आला तरी माझ्या नास्तिक्याला कसलीही बाधा येत नाही. कारण वैचारिक किंवा संकल्पनात्मक स्पष्टता माझ्या मनात आहे. पुस्तकं वाचून काढल्यानंतर कट्टर नास्तिक मी बनलो, असं विद्यानंद बापट यांनी स्पष्ट केलं.
एकीकडे गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांनी दुसरीकडे स्वतःच्या धार्मिक आणि वैचारिक प्रवासाबद्दलही स्पष्टपणे भाष्य केलं. धार्मिक वातावरण असलेल्या कुटुंबातील बालपणापासून प्रश्न विचारण्याची सुरू झालेली प्रक्रिया आणि पुढे विविध पुस्तकांच्या वाचनातून नास्तिकतेपर्यंत पोहोचलेला आपला प्रवास त्यांनी या मुलाखतीत उलगडून सांगितला.
