Amit Shah on Hindi Day : हिंदी दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Hindi) यांनी हिंदीच्या महत्त्वावर भाष्य करताना देशाच्या भाषिक विविधतेचंही महत्त्व अधोरेखित केलं. भारताच्या प्रत्येक भाषेशी इतिहास, लोकपरंपरा आणि संस्कृती जोडलेली असून, हिंदीचं स्थानही या विविधतेत महत्त्वाचं असल्याचं शाह म्हणाले. इतर भारतीय भाषांमध्ये हिंदीची बरोबरी होऊ शकत नाही, असं विधान करत त्यांनी तरुणांनी अधिकाधिक भारतीय भाषा शिकाव्यात, मात्र मातृभाषेपासून दूर जाऊ नये, असं आवाहन केलं.
स्वतःची भाषा बोलताना कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये, असंही शाह यांनी सांगितलं. पालकांनी मुलांशी शक्यतो मातृभाषेत संवाद साधावा, असं आवाहन त्यांनी केलं. भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसून ती व्यक्तीला आई, माती, इतिहास आणि संस्कृतीशी जोडते, असं शाह म्हणाले. स्वातंत्र्यानंतर भारतीय भाषांनी राष्ट्रउभारणी, प्रशासन आणि विकासाचा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं त्यांनी नमूद केलं.
हिंदी भाषा दिन साजरा करण्याची गरज नाही – योगेंद्र यादव
हिंदीचा प्रसार केवळ हिंदी भाषिकांनीच केला नाही, याकडेही अमित शाह यांनी लक्ष वेधलं. आपली मातृभाषा गुजराती असूनही स्वामी दयानंद सरस्वती यांनी ‘सत्यार्थ प्रकाश’ हिंदीत लिहिला. महात्मा गांधींनी 1918 मध्ये दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेची स्थापना केली, तर बंगाली भाषिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेत हिंदीचा वापर केला आणि ‘जय हिंद’ ही घोषणा देशाला दिली, असं शाह यांनी सांगितलं.
भाषेच्या माध्यमातून वसाहतवादी मानसिकतेतून मुक्त होण्याची गरजही शाह यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या आवाहनाचा उल्लेख करत त्यांनी भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायद्यांचा दाखला दिला. ब्रिटिशकालीन कायद्यांची जागा भारतीय कायद्यांनी घेणं हा केवळ नावबदल नसून राष्ट्रीय अभिमान आणि आत्मसन्मानाची पुनर्स्थापना असल्याचं त्यांनी म्हटलं. दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिन साजरा केला जातो. 1949 मध्ये याच दिवशी संविधान सभेने देवनागरी लिपीतील हिंदीला संघाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारलं होतं.
