WhatsApp चं बहुप्रतीक्षित फीचर अखेर रोल आऊट; 14 दिवस आधी शेड्यूल करता येणार मेसेज, फोटो अन्…

WhatsApp चं बहुप्रतीक्षित Message Scheduling Feature अखेर रोल आऊट झालं असून, आता तुम्ही 14 दिवस आधी  मेसेज, फोटो अन् व्हिडिओ शेड्यूल करू शकणार

WhatsApp Message Scheduling Feature Roll Out

WhatsApp Message Scheduling Feature Roll Out

WhatsApp Message Scheduling Feature Roll Out : एखाद्याचा वाढदिवस असतो, एखादी महत्त्वाची आठवण करून द्यायची असते किंवा ठराविक वेळी एखादा मेसेज पाठवायचा असतो… पण ऐनवेळी विसर पडतो? आता अशा समस्येवर WhatsApp ने भन्नाट पर्याय आणला आहे. कारण आता तुम्हाला मेसेज पाठवण्यासाठी ठराविक वेळी ऑनलाइन राहण्याची गरज नाही. तुम्ही आधीच मेसेज तयार करून त्याची तारीख आणि वेळ निश्चित करू शकणार आहात. कारण, WhatsApp चं बहुप्रतीक्षित फीचर अखेर रोल आऊट झालं असून, आता तुम्ही 14 दिवस आधी  मेसेज, फोटो अन् व्हिडिओ शेड्यूल करू शकणार आहात.

काय आहे WhatsApp चं नवीन फीचर?

Meta च्या मालकीच्या WhatsApp ने 25 नोव्हेंबर रोजी आपल्या X अकाउंटवर या नव्या फीचरचा टीझर शेअर केला आहे. या सुविधेमुळे युजर्सना वैयक्तिक चॅटसोबतच ग्रुप चॅटमध्येही मेसेज आधीच शेड्यूल करता येणार आहेत. रिपोर्टनुसार, युजर्सना किमान 10 मिनिटांपासून ते कमाल दोन आठवड्यांपर्यंत आधी मेसेज शेड्यूल करता येणार आहे. म्हणजेच, महत्त्वाचे मेसेज पाठवण्याचं नियोजन आता आधीच करता येईल.

शेड्यूल केलेला मेसेज डिलीटही करता येणार

समजा, तुम्ही एखादा मेसेज शेड्यूल केला आणि नंतर तुमचा निर्णय बदलला, तर काळजी करण्याची गरज नाही. WhatsApp मध्ये शेड्यूल केलेले मेसेज पाहण्याची आणि ते पाठवण्यापूर्वी डिलीट करण्याची सुविधाही मिळणार आहे. चॅटच्या डिटेल्स सेक्शनमध्ये शेड्यूल केलेल्या प्रलंबित मेसेजची स्वतंत्र यादी दिसेल. यामधून तुम्ही मेसेज तपासू शकता किंवा गरज पडल्यास तो डिलीट करू शकता. मेसेज पाठवण्यापूर्वी डिलीट केल्यास समोरच्या व्यक्तीला त्याबाबत कोणतीही नोटिफिकेशन जाणार नाही. ग्रुप चॅटमध्ये मेसेज शेड्यूल करताना एक महत्त्वाची अट आहे. तुम्ही ज्या वेळी मेसेज शेड्यूल कराल, त्या वेळी ग्रुपमध्ये असलेल्या सदस्यांनाच तो मेसेज मिळेल. त्यानंतर ग्रुपमध्ये सहभागी होणाऱ्या नव्या सदस्याला आधी शेड्यूल केलेला मेसेज मिळणार नाही.

सर्वांना फीचर कधी मिळणार?

मीडिया रिपोर्टनुसार, काही युजर्सना या फीचरचा पर्याय दिसू लागला आहे. मात्र, अद्याप सर्व WhatsApp अकाउंटवर हे फीचर उपलब्ध झालेलं नाही. कंपनीकडून ते टप्प्याटप्प्याने रोलआउट केलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तुमच्या अॅपमध्ये हा पर्याय दिसत नसेल, तर काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. या शेड्यूल मेसेजसाठीही WhatsApp चं एंड-टू-एंड एन्क्रिप्शन लागू राहणार असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

WhatsApp वर मेसेज कसा शेड्यूल करायचा?

– सर्वप्रथम WhatsApp उघडा.

– ज्या व्यक्तीला किंवा ग्रुपला मेसेज पाठवायचा आहे, ती चॅट ओपन करा.

– मेसेज टाइप करा किंवा फोटो, व्हिडीओ अथवा लिंक अटॅच करा.

– त्यानंतर Send बटण काही वेळ दाबून ठेवा.

– स्क्रीनवर मेसेज शेड्यूल करण्याचा पर्याय दिसेल.

– आता तुमच्या गरजेनुसार तारीख आणि वेळ निवडा.

– शेड्यूल कन्फर्म केल्यानंतर ठरलेल्या वेळी मेसेज आपोआप पाठवला जाईल.

 

Exit mobile version