Youth dies after getting trapped between vehicles : हिंगोली जिल्ह्यातील औंढा रोडवरील दिग्रस पती परिसरात कावड यात्रेच्या मिरवणुकीदरम्यान घडलेल्या एका धक्कादायक घटनेत 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे आणि दोन डीजे चालकांच्या बेफिकीर वर्तनामुळे एका उमद्या तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होत असून या घटनेने डीजे संस्कृती आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कावड, यात्रेची मिरवणूक सुरू असताना दोन डीजे चालकांमध्ये आवाज वाढवण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. सुरुवातीला झालेला शाब्दिक वाद काही वेळातच विकोपाला गेला. त्यानंतर दोन्ही चालकांनी अक्षरशः एखाद्या चित्रपटातील दृश्याला लाजवेल असा प्रकार करत आपापले डीजे वाहन रिव्हर्स घेत एकमेकांवर धडकवण्याचा प्रयत्न केला.
याच गोंधळात सोमनाथ रोहिदास भानावत हा 19 वर्षीय तरुण दोन्ही डीजे वाहनांच्या मध्ये अडकला. या धडकेत तो गंभीर जखमी झाला. मात्र, या घटनेतील सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे तरुण जखमी होऊन तडफडत असताना देखील डीजेच्या प्रचंड आवाजामुळे त्याच्या वेदना आणि आरडाओरड अनेकांच्या लक्षातच आल्या नाहीत. काही काळ तो जखमी अवस्थेत तडफडत पडून असल्याचे देखील समोर आले आहे.
Tukaram Mundhe : महाप्रसादासाठी अधिकृत नोंदणी अनिवार्य; तुकाराम मुंढेंचा मोठा आदेश
घटनेनंतर स्थानिकांनी आणि उपस्थितांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सोमनाथ भानावतच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये डीजे वाहनांचा बेदरकारपणा, निर्माण झालेला गोंधळ आणि जखमी झालेल्या तरुणाची अवस्था स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रोहित पवारांच्या पीएच्या 12 वर्षीय मुलीचा रहस्यमय मृत्यू; नेमकं काय घडलं?
दरम्यान या घटनेनंतर राज्यातील डीजे संस्कृती, ध्वनिप्रदूषण आणि मिरवणुकांमधील सुरक्षेच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत वेळोवेळी मार्गदर्शक सूचना आणि निर्बंध लागू केले असतानाही अनेक ठिकाणी त्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कर्णकर्कश आवाज करणाऱ्या आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या डीजेवर कठोर निर्बंध घालण्याची आवशक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. एका धार्मिक मिरवणुकीत उत्सवाचे रूपांतर शोकांतिकेत झाले आणि एका तरुणाचा जीव गेला. सोमनाथ भानावतच्या मृत्यूमुळे आता प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि सरकार यांच्यासमोर सार्वजनिक कार्यक्रमांमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे उभा ठाकला आहे.
