1 नोव्हेंबरपासून दारू खरेदीचे नियम बदलले; 1 हजारांवरील बिलासाठी UPI पेमेंट अनिवार्य

Digital Payments For Liquor हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची दारू खरेदी केल्यास UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरणं अनिवार्य

Digital Payments Mandatory For Liquor Bills

Digital Payments Mandatory For Liquor Bills

Digital Payments Mandatory For Liquor Bills Above Rs 1,000 : दारू खरेदी करण्यासाठी दुकानात गेलात, आवडीची बाटली निवडली आणि बिल 1 हजार रुपयांपेक्षा जास्त झालं, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता अशा खरेदीसाठी खिशातील रोख रक्कम चालणार नाही, तर UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डनेच पैसे भरावे लागणार आहेत. 1 नोव्हेंबरपासून 1 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या दारू खरेदीसाठी डिजिटल पेमेंट अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआयच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे. हा निर्णय घेण्यामागचं कारण काय? त्याबद्दल जाणून घेऊया….

दारू खरेदीचे नियम का बदलले?

दारूच्या विक्रीतील व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि रोख रक्कम हाताळताना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, ग्राहकांकडून दारूच्या बाटल्यांसाठी छापील कमाल किरकोळ किमतीपेक्षा (MRP) जास्त पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे आल्या होत्या. हा नवा नियम तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन अर्थात TASMAC या सरकारी महामंडळाने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामंडळाच्या राज्यभरात तब्बल ४,०४८ मद्यविक्रीच्या दुकानांचं जाळं आहे. सध्या या दुकानांमध्ये UPI, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, बहुतांश व्यवहार रोख रकमेनेच केले जातात. त्यामुळे आता मोठ्या रकमेच्या खरेदीसाठी डिजिटल पेमेंट बंधनकारक करण्यात येणार आहे.

दररोज मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हाताळल्यामुळे दुकानातील कर्मचाऱ्यांना अनेक व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये रोख रक्कम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना असणारी सुरक्षा, हिशोबात तफावत निर्माण होणं आणि बनावट नोटांचा धोका, यासह आदी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आला आहे”, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली.

ग्राहकांना काय फायदा होणार?

या निर्णयामुळे प्रत्येक व्यवहाराची डिजिटल नोंद तयार होईल. ग्राहकाने किती पैसे दिले आणि व्यवहार नेमका कधी झाला, याची माहिती उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे मद्याची विक्री निर्धारित किमतीनुसार होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवणं प्रशासनाला सोपं होईल. तसेच, दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हाताळताना कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणीही कमी होण्याची अपेक्षा आहे. रोख रक्कम एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना होणारे सुरक्षेचे प्रश्न, हिशेबातील तफावत आणि बनावट नोटांचा धोका कमी करण्यासाठीही डिजिटल व्यवहारांचा उपयोग होऊ शकतो.

वैयक्तिक QR कोडवर पैसे घेतल्यास कारवाई

नव्या नियमांनुसार, दुकानातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक UPI QR कोडवर किंवा वैयक्तिक बँक खात्यात ग्राहकांकडून पैसे स्वीकारता येणार नाहीत. व्यवहार केवळ अधिकृत पेमेंट यंत्रणेद्वारेच करावा लागणार आहे. तसेच प्रत्येक खरेदीसाठी ग्राहकांना प्रत्यक्ष बिल देणं बंधनकारक असेल. अधिकृत POS मशीनवर व्यवहाराची पडताळणी झाल्यानंतरच मद्याच्या बाटल्या ग्राहकांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

दुकानांमध्ये सूचना फलक लावणार

ग्राहकांना नव्या नियमांची माहिती मिळावी यासाठी मद्यविक्रीच्या दुकानांमध्ये दोन फूट बाय तीन फूट आकाराचे ठळक सूचना फलक लावले जाणार आहेत. पेमेंट मशीन व्यवस्थित सुरू आहेत की नाही, इंटरनेट कनेक्टिव्हिटी योग्य आहे की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी जिल्हा व्यवस्थापकांवर सोपवण्यात आली आहे. या बदलांच्या अंमलबजावणीचा दर आठवड्याला आढावाही घेतला जाणार आहे.

महाराष्ट्रातही असा नियम येणार?

वरील सर्व माहिती वाचून असा नियम महाराष्ट्रातही येणार का? असा प्रश्न पडला असेल तर, सध्या तरी या निर्णयाचा संबंध तामिळनाडूमधील सरकारी मद्यविक्रीच्या दुकानांशी असून, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात 1 हजार रुपयांवरील दारू खरेदीसाठी डिजिटल पेमेंट अनिवार्य झालेलं नाही. मात्र, दारूच्या विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि MRP पेक्षा जास्त पैसे आकारण्याच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी डिजिटल व्यवहारांचा वापर कसा केला जाऊ शकतो, याचं हे एक उत्तम उदाहरण असल्याची चर्या यामुळे सुरू झाली आहे.  आता या नव्या नियमामुळे प्रत्यक्षात ग्राहकांच्या तक्रारी कमी होतात का आणि व्यवहारांवर किती प्रभावी नियंत्रण येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version