HDFC Bank ने वाढवले कर्जाचे व्याजदर, गृहकर्जासह वैयक्तिक कर्जाचा EMI महागणार

HDFC Bank MCLR Rate Hike : एचडीएफसी बँकेने विविध मुदतींच्या एमसीएलआर दरात 5 ते 15 बेसिस पॉइंट्सची वाढ केल्याची माहिती समोर.

News Photo   2026 11 11T170720.730

HDFC Bank MCLR Rate Hike

HDFC Bank MCLR Rate Hike : देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेने कर्जदारांना मोठा आर्थिक धक्का दिला आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच एमसीएलआरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध मुदतींच्या एमसीएलआर दरात ५ ते १५ बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली असून, सुधारित दर ७ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. या निर्णयामुळे एमसीएलआरशी जोडलेली गृहकर्जे, वैयक्तिक कर्जे आणि इतर कर्जांच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी संबंधित ग्राहकांना आता कर्जफेडीसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

एचडीएफसी बँकेने केलेल्या या बदलानंतर एमसीएलआरचा दर पूर्वीच्या ७.७५ ते ८.५५ टक्क्यांवरून वाढून ७.८५ ते ८.७० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. विशेषतः सहा महिने, एक वर्ष, दोन वर्षे आणि तीन वर्षांच्या मुदतीच्या एमसीएलआरमध्ये १५ बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. तर इतर मुदतींच्या दरात ५ ते १० बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे. एका बेसिस पॉइंटचा अर्थ ०.०१ टक्के असा होतो. त्यामुळे कर्जाचा कालावधी आणि संबंधित व्याजदरानुसार ग्राहकांच्या कर्जफेडीच्या रकमेवर या बदलाचा परिणाम होणार आहे.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

या व्याजदरवाढीचा परिणाम कसा होऊ शकतो, याचे उदाहरण पाहिल्यास २० लाख रुपयांचे गृहकर्ज २० वर्षांसाठी घेतले असून त्यावर पूर्वी ८ टक्के व्याजदर लागू असेल, तर मासिक हप्ता सुमारे १६ हजार ७२९ रुपये होतो. व्याजदर वाढून ८.१५ टक्के झाल्यास हाच हप्ता सुमारे १६ हजार ९१६ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजेच ग्राहकाच्या मासिक हप्त्यात सुमारे १८७ रुपयांची वाढ होईल. व्याजदरातील वाढ कमी वाटत असली तरी दीर्घकालीन कर्जाच्या बाबतीत त्याचा एकूण परतफेडीच्या रकमेवर परिणाम होऊ शकतो.

मात्र, एचडीएफसी बँकेच्या या निर्णयाचा सर्वच कर्जदारांना फटका बसणार नाही. ज्या ग्राहकांची गृहकर्जे, वैयक्तिक कर्जे, वाहन कर्जे किंवा इतर फ्लोटिंग रेट कर्जे एमसीएलआरशी जोडलेली आहेत, त्यांच्यावरच या बदलाचा थेट परिणाम होऊ शकतो. रेपो रेटसारख्या अन्य बेंचमार्कशी जोडलेल्या कर्जदारांच्या व्याजदरात या निर्णयामुळे आपोआप वाढ होणार नाही. तसेच प्रत्येक ग्राहकाच्या कर्जाचा व्याजदर कधी बदलणार, हे त्याच्या कर्ज करारातील व्याजदर पुनर्निर्धारणाच्या तारखेवर अवलंबून असेल. त्यामुळे एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांनी आपले कर्ज कोणत्या बेंचमार्कशी जोडलेले आहे आणि पुढील व्याजदर बदलाची तारीख कोणती आहे, याची माहिती घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version