Passport New Rules 2026: पासपोर्टचे नवे नियम लागू, शुल्कवाढीसह अल्पवयीन मुलांसाठीही महत्त्वाचा बदल

नव्या नियमानुसार 15 वर्षांखालील मुलांना जारी करण्यात येणाऱ्या 36 पानी सामान्य पासपोर्टच्या वैधतेबाबत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

Untitled Design   2026 09 18T121555.240

Untitled Design 2026 09 18T121555.240

New passport rules come into effect : पासपोर्ट काढणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले असून ‘पासपोर्ट (सुधारणा) नियम, 2026’ अधिसूचित केले आहेत. या नव्या नियमांमध्ये विशेषतः अल्पवयीन मुलांच्या पासपोर्टची वैधता आणि पासपोर्ट अर्जासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कासंदर्भात बदल करण्यात आले आहेत. 15 सप्टेंबर रोजी अधिकृत राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर हे नियम तात्काळ लागू झाले आहेत.

नव्या नियमानुसार 15 वर्षांखालील मुलांना जारी करण्यात येणाऱ्या 36 पानी सामान्य पासपोर्टच्या वैधतेबाबत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. अशा मुलांचा पासपोर्ट जारी केल्याच्या तारखेपासून पाच वर्षांसाठी किंवा संबंधित मूल 18 वर्षांचे होईपर्यंत, यापैकी जी तारीख आधी येईल तोपर्यंत वैध राहणार आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टच्या वैधतेबाबत आता अधिक स्पष्ट नियम लागू करण्यात आला आहे.

पासपोर्ट नियम, 1980 मधील नियम 8(1) मध्येही सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार विविध प्रकारच्या पासपोर्ट अर्जांसाठी आकारण्यात येणारे शुल्क आता सुधारित अनुसूची-4 मध्ये निश्चित केलेल्या दरांनुसार आकारले जाणार आहे. मूळ पासपोर्ट नियमांमध्ये जून 2026 मध्येही सुधारणा करण्यात आली होती आणि आता नव्या बदलांद्वारे विशेषतः अल्पवयीन अर्जदारांच्या पासपोर्टबाबत नियम अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच पासपोर्टशी संबंधित विविध सेवांच्या शुल्कात वाढ केली असून सुधारित दर 1 जुलैपासून लागू झाले आहेत. नवीन पासपोर्ट, पासपोर्टचे नूतनीकरण किंवा पुनर्जारी, तात्काळ सेवा, हरवलेला किंवा खराब झालेला पासपोर्ट बदलून घेणे तसेच पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट अर्थात PCC यासह विविध सेवांवर सुधारित शुल्क लागू करण्यात आले आहे.

परतीच्या पावसाची चाहूल! महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज

प्रौढांसाठी सामान्य श्रेणीतील 36 पानी नवीन किंवा नूतनीकरणाच्या पासपोर्टसाठी आता 2,500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यापूर्वी हे शुल्क 1,500 रुपये होते. म्हणजेच या सेवेसाठी एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर 60 पानी पासपोर्टसाठी पूर्वीच्या 2,000 रुपयांऐवजी आता 3,500 रुपये मोजावे लागणार आहेत.

तात्काळ पासपोर्ट सेवाही महाग झाली आहे. प्रौढ व्यक्तीला 36 पानी पासपोर्ट तात्काळ सेवेत मिळवण्यासाठी आता 5,000 रुपये भरावे लागतील. यापूर्वी हे शुल्क 3,500 रुपये होते. तर 60 पानी तात्काळ पासपोर्टसाठी आता 6,000 रुपये शुल्क आकारण्यात येईल, जे यापूर्वी 4,000 रुपये होते. 60 पानी पासपोर्ट हरवल्यास किंवा खराब झाल्यास तात्काळ सेवेत त्याच्या बदलीसाठी आता 8,500 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हे शुल्क 5,500 रुपये होते.

SSC-HSC Exam 2027 दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जानेवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा

अल्पवयीन मुलांच्या पासपोर्ट शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. सामान्य श्रेणीत 36 पानी नवीन किंवा पुनर्जारी पासपोर्टसाठी आता 1,750 रुपये शुल्क आकारण्यात येईल. यापूर्वी हे शुल्क 1,000 रुपये होते. याच पासपोर्टसाठी तात्काळ सेवेत 3,000 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. मात्र काही अर्जदारांना मिळणारी सवलत कायम ठेवण्यात आली आहे. आठ वर्षांखालील मुलांच्या नवीन पासपोर्ट अर्जावर तसेच 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या नवीन अर्जावर 10 टक्के सवलत सुरू राहणार आहे. ही सवलत मात्र पासपोर्टच्या पुनर्जारीसाठी लागू होणार नाही.

एकूणच नव्या बदलांनंतर पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांना पूर्वीपेक्षा जास्त शुल्क मोजावं लागणार आहे. त्याचवेळी 15 वर्षांखालील मुलांच्या 36 पानी सामान्य पासपोर्टची वैधता पाच वर्षे किंवा मूल 18 वर्षांचे होईपर्यंत, यापैकी जे आधी असेल तोपर्यंत राहणार आहे. त्यामुळे नवीन पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांनी सुधारित शुल्क आणि नव्या नियमांची माहिती तपासूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version