महिन्यात दोनदा पीरीयड्स आलेय, जाणून घ्या धोका अन् कारणं काय?

Periods काही वेळा एखाद्या महिलेला महिन्यात दोनदा पीरीयड्स येतात सतत असे घडत राहणे शरीरातील अंतर्गत समस्येचे संकेत असू शकतात.

Periods

Periods

Periods come twice a month, know the risks and causes : महिलांना साधारणपणे महिन्यातून एकदाच पीरीयड्स येतात. ही नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. मात्र काही वेळा एखाद्या महिलेला महिन्यात दोनदा पीरीयड्स येतात आणि त्यामुळे चिंता निर्माण होऊ शकते. ही परिस्थिती नेहमीच गंभीर असेल असे नाही, पण जर वारंवार असे होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. यामागे अनेक शारीरिक, हार्मोनल आणि जीवनशैलीशी संबंधित कारणे असू शकतात.

आजच्या काळात महिलांमध्ये पीरीयड्सशी संबंधित अनेक समस्या वाढताना दिसत आहेत. अनियमित पीरीयड्स, जास्त रक्तस्राव, कमी दिवसांचे चक्र, वेदना आणि हार्मोनल तक्रारी या समस्या सर्वसाधारण झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या मासिक पाळीच्या चक्राची माहिती आणि निरीक्षण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या पाळीच्या चक्राला समजून घ्या

सामान्यतः मासिक पाळीचे चक्र 28 दिवसांचे मानले जाते. परंतु 21 ते 35 दिवसांच्या दरम्यान पीरीयड्स येत असतील, तरी ते सामान्य समजले जाते. जर एखाद्या महिलेला 21 दिवसांपेक्षा कमी अंतराने किंवा 36 दिवसांपेक्षा जास्त अंतराने पाळी येत असेल, किंवा दर महिन्याला तारखांमध्ये मोठा फरक जाणवत असेल, तर ते अनियमित पीरीयड्सचे लक्षण असू शकते. कधी कधी ताणतणाव, आहारातील बदल, झोपेची कमतरता, व्यायामाचा अभाव किंवा अचानक वजन कमी-जास्त होणे यामुळे पीरीयड्सची तारीख पुढे-मागे होऊ शकते. एक-दोन वेळा असे होणे सामान्य असले तरी सतत असे घडत राहणे शरीरातील अंतर्गत समस्येचे संकेत असू शकतात.

महिन्यात दोनदा पाळी येण्यामागची कारणे

1. हार्मोनल असंतुलन

महिन्यात दोनदा पीरीयड्स येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे हार्मोनल असंतुलन. स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन हे हार्मोन्स पीरीयड्सचे चक्र नियंत्रित करतात. या हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यास पाळी अनियमित होऊ शकते आणि एका महिन्यात दोनदा रक्तस्राव होऊ शकतो. अतिरिक्त मानसिक ताण, झोपेचा अभाव, कामाचा दबाव, चुकीचा आहार आणि जीवनशैलीतील अचानक बदल यामुळे हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे पाळीचे चक्र विस्कळीत होऊ शकते.

2. पॉलिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस)

पीसीओएस ही महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य हार्मोनल समस्या आहे. यात अंडाशयांमध्ये लहान गाठी तयार होतात, ज्यामुळे अंडोत्सर्जन व्यवस्थित होत नाही. परिणामी पीरीयड्स कधी उशिरा येतात, कधी खूप लवकर येतात, तर काही वेळा महिन्यात दोनदा देखील येऊ शकतात. पीसीओएससोबत वजन वाढणे, चेहऱ्यावर केस येणे, मुरुम आणि गर्भधारणेतील अडचणी अशा समस्या देखील दिसू शकतात.

3. गर्भाशयातील फायब्रॉइड्स

युटेरीन फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयात तयार होणाऱ्या लहान गाठी. या गाठी कॅन्सर नसतात, पण त्यांचा आकार आणि त्या गर्भाशयात नेमक्या कुठे आहेत. यावरून पीरीयड्सवर परिणाम होऊ शकतो. काही महिलांना खूप जास्त रक्तस्राव होतो, तर काहींना महिन्यात दोनदा पीरीयड्स येऊ शकतात. विशेषतः पाळी जास्त दिवस चालणे किंवा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणे ही फायब्रॉइड्सची सामान्य लक्षणे आहेत.

4. थायरॉईडचे विकार

थायरॉईड जसे हायपोथायरॉईडीझम किंवा हायपरथायरॉईडीझम हे देखील पीरीयड्सवर परिणाम करू शकतात. थायरॉईड ग्रंथी शरीरातील अनेक हार्मोन्स नियंत्रित करते. त्यामुळे तिच्या कार्यात बिघाड झाल्यास पीरीयड्सचे वेळापत्रक बदलू शकते. काही महिलांना कमी रक्तस्राव होतो, तर काहींना वारंवार पीरीयड्स येते. थकवा, वजनातील बदल आणि मूड स्विंग्स ही त्याची इतर लक्षणे असू शकतात.

ही परिस्थिती किती धोकादायक आहे?

महिन्यात दोनदा पीरीयड्स येणे एकदाच झाले तर ते नेहमीच गंभीर नसते. परंतु जर हा प्रकार वारंवार होत असेल, रक्तस्राव खूप जास्त होत असेल, कमजोरी जाणवत असेल किंवा पोटदुखी तीव्र असेल, तर हे गंभीर संकेत असू शकतात. सतत जास्त रक्तस्राव झाल्यास शरीरात रक्ताची कमतरता (अॅनिमिया) निर्माण होऊ शकते. म्हणूनच, महिलांनी स्वतःच्या पीरीयड्सच्या चक्राकडे लक्ष देणे, तारीख नोंदवून ठेवणे आणि कोणताही अनियमित बदल दिसल्यास त्वरित स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. योग्य तपासणीमुळे कारण स्पष्ट होते आणि वेळेत उपचार मिळू शकतात.

Exit mobile version