90 हजार पगार असलेला पुण्यातील तरूण कसा अडकला 15 लाखांच्या कर्जात?

Linkedin Post 90 हजार रुपयांच्या मासिक पगारापैकी सुमारे 51 हजार रुपये, म्हणजेच 57 टक्के उत्पन्न, केवळ कर्जाचे हप्ते भरण्यात खर्च होत आहे.

Pune Man Salary 90, 000 Trapped In 15 lakh debt Viral LinkedIn post

Pune Man Salary 90, 000 Trapped In 15 lakh debt Viral LinkedIn post

Pune Man Salary 90, 000 Trapped In 15 lakh debt Viral Linkedin post : चांगला पगार, नियोजनबद्ध खर्च आणि कोणतीही उधळपट्टी नाही… तरीही पुण्यातील एका 36 वर्षीय ऑपरेशन्स मॅनेजरवर आज तब्बल 15 लाख रुपयांचे कर्ज आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा आर्थिक डोंगर चुकीच्या गुंतवणुकीमुळे किंवा चैनीच्या जीवनशैलीमुळे नव्हे, तर एका वैद्यकीय आणीबाणीमुळे उभा राहिला. आर्थिक सल्लागार विवेक यांनी लिंक्डइनवर शेअर केलेला हा अनुभव मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी डोळे उघडवणारा आहे.

सोने 20% घसरले तरी बँकांचे पैसे का बुडत नाहीत?; CRISIL ने उलगडले गोल्ड लोनचे संपूर्ण गणित

कुठून सुरू झाला ‘कर्जाचा चक्रव्यूह’?

तीन वर्षांपूर्वीपर्यंत या कर्मचाऱ्याचे आयुष्य सुरळीत सुरू होते. त्याचा दरमहा 90 हजार रुपयांचा टेक-होम पगार होता. त्यापैकी 82 हजार रुपये घरखर्च, मुलांचे शिक्षण, किराणा आणि आई-वडिलांच्या औषधांवर खर्च होत होते. दरमहा सुमारे 8 हजार रुपयांची बचत होत होती. कर्ज नव्हते आणि आर्थिक व्यवहारही व्यवस्थित होते. Viral Linkedin post

पण अचानक एकेदिवशी वडिलांची प्रकृती बिघडली आणि तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी 5 लाख रुपयांची गरज निर्माण झाली. त्यात हाताशी पुरेशी बचत नसल्याने या तरूणाने 14 टक्के व्याजदराने 5 लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतले. त्याचा दरमहा 13,663 रुपयांचा ईएमआय सुरू झाला आणि इथूनच त्याच्या आर्थिक संकटाची नांदी झाली.

EMI मुळे बिघडले संपूर्ण बजेट

पगार 90 हजार आणि पूर्वीचा मासिक खर्च 82 हजार रुपये होता. त्यात 13,663 रुपयांचा EMI जोडला गेल्याने खर्च थेट 96 हजार रुपयांवर गेला. मात्र पगार 90 हजार रुपयांचाच राहिला. परिणामी, दरमहा सुमारे 6 हजार रुपयांची तूट निर्माण झाली. ही तूट भरून काढण्यासाठी या तरूणाने क्रेडिट कार्डचा वापर सुरू केला.



एका वर्षात 4 लाखांचे क्रेडिट कार्ड बिल

सुरुवातीला किराणा, इंधन आणि इतर छोट्या खर्चासाठी वापरलेले क्रेडिट कार्ड हळूहळू मोठ्या कर्जात बदलले आणि अवघ्या एका वर्षात क्रेडिट कार्डची थकबाकी 4 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. त्यावर सुमारे 40 टक्के व्याजदर लागू झाला आणि दरमहा किमान 20 हजार रुपये भरावे लागू लागले.

पहिल्या कर्जाचा EMI आणि क्रेडिट कार्डची वाढती थकबाकी यामुळे आर्थिक ताण वाढत गेला. परिस्थिती सावरण्यासाठी त्याने 6 लाख रुपयांचे आणखी एक कर्ज घेतले. मात्र, तोपर्यंत त्याचा CIBIL स्कोअर घसरल्याने हे कर्ज 18 टक्के व्याजदराने मिळाले. यामुळे दरमहा
17,625 रुपयांचा आणखी एक EMI वाढला.

आज पगाराच्या 57% रक्कम फक्त EMI साठी

आज या कर्मचाऱ्यावर एकूण 15 लाख रुपयांचे कर्ज आहे. त्याच्या 90 हजार रुपयांच्या मासिक पगारापैकी सुमारे 51 हजार रुपये, म्हणजेच 57 टक्के उत्पन्न, केवळ कर्जाचे हप्ते भरण्यात खर्च होत आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी पुन्हा कर्ज घेण्याची वेळ येते. आर्थिक सल्लागारांच्या मते, हीच ‘डेब्ट ट्रॅप’ किंवा कर्जाच्या दुष्टचक्राची खरी सुरुवात असते.

Flipkart GOAT Sale च्या नावाखाली सायबर फसवणूक; पोलिसांचा इशारा नेमका काय?

तज्ज्ञांचा इशारा, रेड फ्लॅग ओळखा

आर्थिक सल्लागार विवेक यांच्या मते, ही केस प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक धडा आहे. त्यांनी या परिस्थितीतून सावरण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. विवेक यांच्या मते, एक कर्ज दुसऱ्या EMI ला जन्म देते. त्यामुळे हातातील रोख रक्कम कमी होते आणि ती भरून काढण्यासाठी लोक पुन्हा कर्ज किंवा क्रेडिट कार्डचा आधार घेतात. हेच चक्र पुढे मोठ्या आर्थिक संकटात बदलते. त्यामुळे जर तुमची ईएमआय तुमच्या टेक-होम सॅलरीच्या 40 % पेक्षा जास्त जात असेल, तर तो ‘रेड फ्लॅग’ (धोक्याचा इशारा) समजा. 6 महिन्यांच्या घरखर्चासाठी एक स्वतंत्र ‘इमरजेंसी फंड’ असणे काळाची गरज आहे, जेणेकरून मेडिकल इमरजेंसीमध्ये कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. सर्वाधिक व्याजदर असलेले कर्ज (विशेषतः क्रेडिट कार्ड) सर्वप्रथम फेडण्याचा प्रयत्न करा. क्रेडिट कार्डचा वापर तात्काळ थांबवणे आणि अतिरिक्त कर्जाचा बोजा टाळणे, हेच यातून बाहेर पडण्याचे मुख्य सूत्र आहे.

पुण्यातील या कर्मचाऱ्याच्या व्हायरल होणाऱ्या कहाणीतून कर्जाच्या दलदलीत अडकण्यासाठी उधळपट्टी किंवा चुकीचे आर्थिक निर्णयच कारणीभूत असतात, असे नाही. तर, अनेकदा एका अनपेक्षित वैद्यकीय आणीबाणीमुळेही आर्थिक समतोल पूर्णपणे बिघडू शकतो. त्यामुळे आजच्या धावपळीच्या युगात शिस्तबद्ध बचत आणि ‘इमरजेंसी फंड’ हीच काळाची गरज असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

Exit mobile version