SBI Women Loan Scheme : महिलांना व्यवसायाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून ‘स्त्री शक्ती योजना’ (Stree Shakti Yojana) राबवली जातेय. या योजनेअंतर्गत उत्पादन, ट्रेडिंग आणि सेवा क्षेत्रातील संबंधित महिला उद्योजकांना 25 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. एवढेच नाही तर 2 कोटींपर्यंतच्या कर्जावर विशेष व्याजदरात अर्ध्या टक्क्यांपर्यंत सवलत दिली जातेय. या योजनेबाबत जाणून घेऊया या.. जाणून घ्या कर्जाच्या परतफेडीचे नियम आणि अर्ज करण्याची पद्धत.
किती मिळू शकते कर्जाची रक्कम?
व्यवसायाची गरज आणि त्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन महिला उद्योजकांना या योजनेअंतर्गत 25 कोटींपर्यंत कर्ज मिळू शकते. व्यवसायाच्या दैनंदिन खर्चांसाठी तसेच मशिनरी खरेदी करण्यासाठी हे कर्ज दिले जाऊ शकते. कर्जाची अंतिम रक्कम SBI कडून अर्जदाराची पात्रता, व्यवसायाचा आराखडा आणि आर्थिक स्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर निश्चित केली जाते. 2 कोटींपेक्षा अधिक कर्जासाठी लागू होणारा व्याजदर अर्जदाराच्या क्रेडिट रेटिंगशी जोडला जाऊ शकतो.
व्याजदरात मिळणार 0.50% पर्यंत विशेष सवलत
महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एसबीआय या योजनेअंतर्गत व्याजदरात सवलत देते. 2 कोटींपर्यंतच्या कर्जावर महिलांना व्याजदरात 0.50 टक्के म्हणजेच 50 बेसिस पॉइंट्सपर्यंत सवलत मिळू शकते. यामुळे महिला उद्योजकांसाठी कर्जाची परतफेड करताना येणारा व्याजाचा खर्च कमी होण्यास मदत होते. अंतिम व्याजदर आणि इतर शुल्क SBI च्या प्रचलित नियमांनुसार निश्चित केले जातात. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी जवळच्या SBI शाखेत जाऊन लागू व्याजदर आणि शुल्काची अचूक माहिती घेणे आवश्यक आहे.
अन्नपूर्णा आणि श्रृंगार योजनेतून महिला उद्योजकांना मदत
SBI आपल्या ‘स्त्री शक्ती उपक्रमांतर्गत’ महिलांच्या विविध व्यवसायांच्या गरजा लक्षात घेऊन विशेष कर्ज योजनाही उपलब्ध करून देते.
यामध्ये ‘अन्नपूर्णा योजना’ विशेषतः कॅटरिंग, रेस्टॉरंट, टिफिन सर्व्हिस आणि खाद्यपदार्थांशी संबंधित नवीन किंवा आधीपासून सुरू असलेल्या व्यवसायांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देते. तर ‘श्रृंगार योजना’ ब्यूटी पार्लर, ब्यूटी सलून आणि वेलनेस क्षेत्राशी संबंधित महिला उद्योजकांसाठी आहे. व्यवसायाचा विस्तार, ब्यूटी उपकरणांची खरेदी तसेच पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी या योजनेअंतर्गत कर्जाची सुविधा मिळू शकते. या योजनांचा उद्देश महिलांना त्यांच्या कौशल्य आणि व्यवसायाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे.
कर्जाची परतफेड आणि मार्जिन मनीच्या अटी
कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी व्यवसायाचा आकार आणि कर्जाच्या प्रकारावर अवलंबून असतो. टर्म लोनसाठी परतफेडीचा कालावधी 7 ते 10 वर्षांपर्यंत असू शकतो. कर्जाच्या रकमेवर आधारित बँक 15 ते 25 टक्क्यांपर्यंत मार्जिन मनी मागू शकते. म्हणजेच व्यवसायाच्या एकूण खर्चातील काही हिस्सा अर्जदाराला स्वतःच्या निधीतून उभारावा लागतो आणि उर्वरित रक्कम बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात मिळते.
अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR), KYC कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि उपलब्ध मार्जिन मनी यांची योग्य तयारी करून ठेवा. तसेच अर्ज करण्यापूर्वी बँक अधिकाऱ्यांकडून व्याजदर, प्रोसेसिंग फी आणि इतर सेवा शुल्कांची सविस्तर माहिती घ्या. कर्जाच्या अटी, पात्रता आणि अंतिम व्याजदर बँकेच्या नियमानुसार बदलू शकतात.
