सोन्याचा मुलामा, जबरदस्त आवाज अन् लाखोंची किंमत, सोनीने सादर केले नवे म्युझिक प्लेअर

भारतात सोनीचे हे म्युजिक प्लेअर कधी विक्रीसाठी येणार आणि त्यांची किंमत किती असेल, याबाबत कंपनीने अजून माहिती दिलेली नाही.

Untitled Design   2026 10 16T180547.096

Untitled Design 2026 10 16T180547.096

Sony introduces a new music player : संगीत ऐकण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सोनी कंपनीने म्युझिक ऐकण्यासाठी तीन नवे प्रीमियम प्लेअर बाजारात आणले आहेत. या प्लेअरमध्ये गाण्यांचा आवाज अधिक स्पष्ट आणि चांगल्या दर्जाचा ऐकता यावा, यासाठी खास तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. मोठी स्क्रीन, उत्तम आवाज आणि जास्त वेळ चालणारी बॅटरी ही या प्लेअरची खास वैशिष्ट्यं आहेत. विशेष म्हणजे, यामधील एका प्लेअरवर एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 40 तासांपर्यंत गाणी ऐकता येऊ शकतात, असा कंपनीचा दावा आहे.

आता या प्लेअरच्या किमतीबद्दल बोलायचं झालं, तर त्या ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सोनीच्या सर्वात महागड्या प्लेअरची किंमत भारतीय चलनानुसार जवळपास ५ लाख 60 हजार रुपये आहे. दुसऱ्या प्लेअरची किंमत सुमारे 2 लाख 85 हजार रुपये, तर तिसऱ्या प्लेअरची किंमत जवळपास 1 लाख 80 हजार रुपये आहे. या किमती अमेरिकेतील बाजारपेठेनुसार आहेत. भारतात हे प्लेअर कधी विक्रीसाठी येणार आणि त्यांची किंमत किती असेल, याबाबत कंपनीने अजून माहिती दिलेली नाही.

या मालिकेतील सर्वात महागड्या प्लेअरमध्ये खास प्रकारचं शुद्ध तांबं वापरण्यात आलं आहे. त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. यामुळे गाण्यांमधील बास म्हणजेच खोल आवाज अधिक चांगला ऐकायला मिळावा, तसंच आवाजात स्पष्टता यावी, यासाठी मदत होते, असं कंपनीचं म्हणणं आहे. इतर दोन प्लेअरच्या बाहेरील भागासाठी ॲल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे. तसंच, आवाजातील अनावश्यक गोंगाट कमी करण्यासाठीही खास तंत्रज्ञान देण्यात आलं आहे.

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकरांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने उमेदवारी अर्ज वैध ठरवला

या तिन्ही प्लेअरमध्ये मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. त्यापैकी दोन प्लेअरमध्ये साडेपाच इंचांची, तर तिसऱ्या प्लेअरमध्ये पाच इंचांची स्क्रीन आहे. या स्क्रीनवर दिसणारी रचनाही ग्राहकांना आपल्या आवडीनुसार बदलता येणार आहे. तिन्ही प्लेअरमध्ये गाण्यांचा आवाज अधिक चांगल्या दर्जात ऐकता यावा, यासाठी सोनीचं खास ध्वनितंत्रज्ञान देण्यात आलं आहे.

बॅटरीच्या बाबतीतही या प्लेअरमध्ये चांगली क्षमता देण्यात आली आहे. पहिल्या दोन प्लेअरमध्ये गाणी साठवून ऐकल्यास 35 तासांपर्यंत बॅटरी चालू शकते. तर इंटरनेटवरून गाणी ऐकल्यास ही बॅटरी जवळपास 31 तास चालू शकते. तिसऱ्या प्लेअरमध्ये गाणी साठवून ऐकल्यास 40 तास, तर इंटरनेटवरून गाणी ऐकल्यास 35 तासांपर्यंत बॅटरी चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

एकंदरीत, सोनीचे हे नवे प्लेअर खास अशा संगीतप्रेमींसाठी आहेत, ज्यांना गाण्यांचा आवाज सर्वोत्तम दर्जात ऐकायचा आहे आणि त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी आहे. मात्र, एवढी मोठी किंमत पाहता हे प्लेअर सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. आता भारतात हे प्लेअर कधी येणार आणि त्यांना ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version