Success Story : ”खईके पान बनारसवाला, खुल जाए बंद अकल का ताला…” हे गाणं आपण सर्वांनीच ऐकलंय. पण एका MBA पदवीधराने या गाण्यातील ‘अकल’ म्हणजे बुद्धी वापरून चक्क पानाच्या टपरीला ‘मॅनेजमेंट’ची जोड दिली आणि आज हा पारंपारिक व्यवसाय थेट ‘कॅफे कल्चर’चा हिस्सा बनला आहे. याच सक्सेस स्टोरीबद्दल जाणून घेऊया…
साधारणपणे ‘पानाची टपरी’ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अस्वच्छता, तंबाखूची दुर्गंधी आणि गल्लीबोळातील एखादं छोटं दुकान येतं. पण याच अनऑर्गेनाइज्ड क्षेत्राला ‘ब्रँडेड बिझनेस’मध्ये बदलण्याची किमया बिहारच्या पठ्ठ्यांन करून दाखवलीये. बिहारच्या बक्सरचे रहिवासी पी. एन. ठाकूर यांचं शिक्षण MBA पण हुक्की आली पान टपरी टाकायची मग काय लावलं डोकं आणि सुरू झाला व्यावसायाचा श्रीगणेशा. ठाकूर यांनी अशी काही कल्पना लढवली की, एकेकाळी गल्लीबोळात मिळणारे पान आज हाय-फाय मॉल्स आणि आलिशान कॅफेमध्ये ब्रँडेड रूपात विकले जातयं.
टपरी ते ब्रँडेड आउटलेट : एक ‘मस्त’ प्रवास
शेतकरी कुटुंबातून आलेल्या ठाकूर यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून MBA चे शिक्षण पूर्ण केले पण, नोकरीत काही केल्या मन रमेना. त्यामुळे ठाकूर यांनी घरी ‘पानाचा व्यवसाय’ करण्याची इच्छा बोलून दाखवली, तेव्हा त्यांच्या वडिलांना धक्काच बसला. पण ठाकूर यांना या व्यवसायातील संधी दिसत होती.
त्यांनी पाहिलं की, भारतात पान खाणाऱ्यांची संख्या करोडोंमध्ये आहे, पण हे क्षेत्र पूर्णपणे विखुरलेले (Unorganized) आहे. घाणरड्या टपऱ्या आणि तंबाखूचे डाग ही पानाच्या दुकानाची ओळख पुसण्यासाठी त्यांनी ‘मस्त बनारसी पान’ (Mast Banarasi Paan) ची मुहूर्तमेढ रोवली.
ठाकूर यांचा हा प्रवास सोपा नव्हता. व्यवसायासाठी भांडवल नव्हते. अशा वेळी त्यांच्या पत्नी माया कुमारी सावलीसारख्या उभ्या राहिल्या. त्यांनी स्वतःची नोकरी सोडून आणि साठवलेले 2 लाख रुपये ठाकूर यांच्या हाती सोपवत या स्वप्नाला बळ दिले. 2016 मध्ये अवघ्या 2 लाख रुपयांतून ‘मस्त बनारसी पान’चे पहिले दुकान उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे सुरू झाले. आज हा प्रवास 7 कोटींच्या उलाढालीवर पोहोचला असून, 400 हून अधिक आऊटलेट्स भारतभर डौलाने उभे आहेत. ठाकूर यांच्या दुकानात मिळणारी सर्व पानं तंबाखू मुक्त असून, पानाच्या दुकानावर जाण्यास महिला कचरतात, हे ओळखून त्यांनी आउटलेट्समध्ये ‘कॅफे’ सारखं स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण दिलं आहे.
चॉकलेटपासून ते गोल्ड पानापर्यंतची मेजवानी
ठाकूर यांच्या पानाच्या दुकानात केवळ साधं पान मिळत नाही, तर खवय्यांसाठी मोठी रेंज उपलब्ध आहे. यात लक्झरी पानाममध्ये गोल्ड आणि सिल्व्हर पान, फ्युजन पानात चॉकलेट, आईस्क्रीम आणि मॅंगो पानाचा समावेश आहे. आरोग्यासाठी हेल्दी पानांमध्ये ड्रायफ्रूट्स आणि विविध औषधी गुणधर्म असलेले पान मिळते.
400 शहरांत बनारसी स्वाद
आज पुणे, दिल्ली, बेंगळुरू, विजयवाडा ते अगदी श्रीनगरपर्यंत ‘मस्त बनारसी पान’चा सुगंध दरवळत आहे. कोणत्याही परदेशी गुंतवणुकीशिवाय पी. एन. ठाकूर यांनी सिद्ध केलंय की, व्यवसाय छोटा नसतो, फक्त तो करण्याची पद्धत मोठी असावी लागते. शिक्षण कोणतेही असो, जर तुमच्याकडे योग्य रणनीती आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर एका साध्या वस्तूलाही तुम्ही जागतिक ब्रँड बनवू शकता, हेच पी. एन. ठाकूर यांच्या यशाने सिद्ध केले आहे.
थोडक्यात काय तर… ठाकूर यांनी केवळ पान विकलं नाही, तर बदलत्या काळाची गरज ओळखून एका संस्कृतीला आधुनिकतेचा साज चढवला. आज खऱ्या अर्थाने त्यांचा हा बिझनेस पाहून म्हणावसं वाटतं “छोरा गंगा किनारे वाला, मुकाम ले गया सबसे निराला!”
