The monsoon will arrive in Kerala on May 26 : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने यंदाच्या नैऋत्य मान्सूनबाबत महत्वाचा अंदाज व्यक्त केला असून, मान्सून केवळ वेळेआधीच केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचू शकतो. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. 16 मेच्या आसपास मान्सून अंदमान परिसरात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर मान्सूनची आगेकूच होत 26 मेपर्यंत तो केरळ किनारपट्टीवर पोहोचेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
दरम्यान, दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, माहे आणि दक्षिण कर्नाटकात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ईशान्य भारतासाठी देखील हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 13 मे ते 19 मे दरम्यान ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही भागांत ताशी 50 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील काही दिवस देशातील हवामानात मोठे बदल दिसून येणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
जानकरांचा केला पाळणा; कांदा आंदोलन चिघळल, शेट्टी, राऊत पोलिसांच्या ताब्यात
एकीकडे मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार होत असताना, दुसरीकडे उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम आहे. राजस्थानमधील बारमेर येथे देशातील सर्वाधिक 48 पूर्णांक 3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रासाठी देखील ही आनंदाची बातमी मानली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून 5 जूनपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता असून 6 जूनपर्यंत तो कोकण किनारपट्टीवर पोहोचू शकतो. तसेच 7 जूनपर्यंत पुण्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा येण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
