UPI is preparing to give a tough challenge to credit card companies : डिजिटल व्यवहारांची सवय बदलणाऱ्या यूपीआय प्रणालीने आता आणखी एक मोठं पाऊल पुढे टाकण्याची तयारी केली आहे. आतापर्यंत व्यवहार सुलभ करणाऱ्या यूपीआयवरून आता क्रेडिट कार्डसारखीच सवलत असलेली क्रेडिट सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि विविध बँकांमध्ये यासंदर्भात सध्या सखोल चर्चा सुरू असून, लवकरच यूपीआय क्रेडिट लाईनवर ठराविक कालावधीसाठी शून्य व्याज आकारलं जाऊ शकतं.
व्याजाचा अडथळा दूर होणार?
आतापर्यंत यूपीआय क्रेडिट लाईनला अपेक्षित प्रतिसाद न मिळण्यामागे एक महत्त्वाचं कारण होतं. तात्काळ व्याजाची आकारणी. ग्राहकाने क्रेडिट लाईन वापरताच पहिल्या दिवसापासून व्याज लागण्याची शक्यता असल्याने अनेक जण ही सुविधा वापरणं टाळत होते. विशेषतः छोट्या किंवा आपत्कालीन खर्चासाठी पैसे उपलब्ध असूनही, व्याजाच्या भीतीमुळे ग्राहक मागे हटत होते. मात्र, नव्या बदलांमुळे ही अडचण दूर होण्याची चिन्हं आहेत.
नवीन बदल नेमके काय?
NPCI च्या प्रस्तावित धोरणानुसार, यूपीआय क्रेडिट लाईनला आता क्रेडिट कार्डप्रमाणे ‘ग्रेस पिरियड’ देण्याचा विचार केला जात आहे. म्हणजेच, यूपीआयवरून क्रेडिट लाईन वापरून खर्च केल्यानंतर बिल तयार होईपर्यंत त्या रकमेवर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. ग्राहकाने देय तारखेआधी संपूर्ण रक्कम भरल्यास, त्याला अतिरिक्त व्याजाचा कोणताही भार सहन करावा लागणार नाही.
अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीचं पाऊल, गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड
काही बँकांची आधीच सुरुवात
या नव्या मॉडेलची चाचपणी काही बँकांनी सुरूही केली आहे. येस बँक आपल्या यूपीआय क्रेडिट लाईनवर सुमारे 45 दिवसांचा व्याजमुक्त कालावधी देत आहे, तर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 30 दिवसांची व्याजमाफी देत आहे. या प्रयोगाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे येत्या काळात इतर मोठ्या सार्वजनिक आणि खासगी बँका देखील ही सुविधा स्वीकारण्याची दाट शक्यता आहे.
क्रेडिट कार्ड बाजारात अस्वस्थता
जर हा बदल मोठ्या प्रमाणावर लागू झाला, तर यूपीआय केवळ व्यवहाराचं साधन न राहता क्रेडिट कार्डला पर्याय ठरू शकतो. यामुळे सामान्य ग्राहकांना अधिक लवचिक आणि सोपी कर्जसुविधा मिळेल, मात्र दुसरीकडे क्रेडिट कार्ड कंपन्यांसाठी ही एक मोठी स्पर्धा ठरणार आहे.
