Where did Word Bug Comes In Computer Industry : आज आपण सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक अडचण आली की अगदी सहजपणे ‘बग’ (Bug) आला म्हणतो, आणि ती दूर करण्याच्या प्रक्रियेला ‘डीबगिंग’ (Debugging) म्हणतो. पण, तुम्हाला माहीत आहे का? की, तंत्रज्ञान विश्वातील बग हा शब्द एखाद्या व्हायरसमुळे किंवा कोडमधील चुकीमुळे आलेला नाही. तर, तो एका ‘जिवंत’ कीड्यामुळे आला आहे. हो, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण संगणकाच्या इतिहासात नोंदवलेला ‘पहिला बग’ हा अक्षरशः एक खराखुरा कीडा होता.
जेव्हा संगणक ‘ठप्प’ झाला
ही गोष्ट आहे 9 सप्टेंबर 1947 ची. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रयोगशाळेत त्या काळातील महाकाय संगणक ‘Mark II’ वर शास्त्रज्ञ काम करत होते. आजच्या लॅपटॉप किंवा मोबाईलच्या तुलनेत हा संगणक आकाराने प्रचंड मोठा होता आणि त्यात हजारो मेकॅनिकल रिले (स्विच) आणि तारांचे जाळे होते. अचानक, या महाकाय मशीनने काम करणे बंद केले आणि सिस्टिममध्ये वारंवार एरर येऊ लागला. संपूर्ण टीम चिंतेत पडली आणि नक्की बिघाड कुठे झाला आहे, याचा शोध घेणे सुरू झाले.
जेव्हा शास्त्रज्ञांना सापडला ‘खरा’ बग
संगणकाचे हार्डवेअर उघडल्यावर जे दिसले, ते पाहून तिथे उपस्थित असलेले सर्व शास्त्रज्ञ थक्क झाले. मशीनच्या एका रिलेमध्ये एक ‘मॉथ’ म्हणजेच पतंग वर्गातील कीडा अडकला होता. या कीड्यामुळेच तिथे शॉर्ट सर्किट होत होते आणि संगणकात बिघाड निर्माण झाला होता. संगणक शास्त्रज्ञ ग्रेस हॉपर (Grace Hopper) आणि त्यांच्या टीमने तो कीडा बाहेर काढला आणि मशीन पुन्हा चालू केली.
डायरीत चिकटवला तो ‘इतिहास’
केवळ सिस्टिम ठीक करून ते थांबले नाहीत, तर त्या संशोधकांनी तो कीडा टेपच्या साहाय्याने आपल्या लॉगबुकमध्ये म्हणजेच डायरीत चिकटवला आणि खाली लिहिले, “First actual case of bug being found”. तंत्रज्ञान इतिहासातील ही एक अत्यंत महत्त्वाची आणि मजेशीर घटना ठरली. ज्या क्षणी तो ‘बग’ म्हणजेच कीडा हटवला गेला, तेव्हापासूनच संगणकातील तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेला ‘डीबगिंग’ असे नाव पडले.
आजच्या भाषेत ‘बग’ काय आहे?
आता आजच्या काळात संगणक हार्डवेअरमध्ये खरे कीडे शिरणे जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे आज ‘बग’ म्हणजे एखादी प्रोग्रामिंग चूक (Coding Error), ज्याला फिक्स करण्यासाठी आता साधे कीडे काढण्याची गरज नाही, तर हजारो ओळींचे कोड तपासावे लागतात. पण, शून्यापासून सुरू झालेल्या या तंत्रज्ञानाच्या प्रवासात, 1947 च्या त्या एका कीड्याने जगाला एक नवीन शब्द दिला, जो आजही प्रत्येक आयटी इंजिनिअरच्या रोजच्या वापरात आहे आणि तो म्हणजे बग….
