खरचं कोणीतरी आठवण काढतं म्हणून उचकी लागते? की, यामागे आहे वेगळचं कारण…

Hiccups तुम्हाला कधी अचानक उचकी लागली की, घरातलं कुणीतरी लगेच म्हणतं, कोणीतरी तुझी आठवण काढतंय...पण खरचं असं होतं का?

Science Behind Hiccups

Science Behind Hiccups

Why Do We Get Hiccups : तुम्हाला कधी अचानक उचकी लागली की, घरातलं कुणीतरी लगेच म्हणतं, “कोणीतरी तुझी आठवण काढतंय” हे ऐकताच तुम्हीही विचार करायला लागता… कोण असेल बरं आठवण काढणारी ती व्यक्ती? पण, खरचं कुणीतरी आठवण काढतयं म्हणून उचकी लागते की यामागे आणखी काही कारणं आहे? त्याबद्दल जाणून घेऊया…

तर, आपल्या छातीच्या आणि पोटाच्या मध्ये एक महत्त्वाचा स्नायू असतो. त्याला म्हणतात डायाफ्राम. आपण श्वास घेतो तेव्हा हा स्नायू आकुंचन पावतो आणि फुफ्फुसांमध्ये हवा भरण्यास मदत करतो. पण कधीकधी या डायाफ्राममध्ये अचानक आणि अनैच्छिक आकुंचन होतं. त्याचवेळी आपल्या स्वरयंत्रातील व्होकल कॉर्ड्स अचानक बंद होतात आणि त्यातून निर्माण होते ती उचकी…

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, डायाफ्राम अचानक आकुंचन पावतो तरी कशामुळे? तर, यामागे खूप वेगाने जेवण करणं, गरजेपेक्षा जास्त अन्न खाणं, कोल्ड ड्रिंक्स किंवा सोडा जास्त पिणं, अचानक तापमानात बदल होणं, खूप हसणं किंवा उत्साहात जास्त बोलणं अशी काही सामान्य कारणं आहेत. ज्यामुळे पोट फुगू शकतं किंवा डायाफ्रामच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या वेगस नर्व्ह आणि फ्रेनिक नर्व्हना उत्तेजना मिळू शकते. या नसांच्या सिग्नलमध्ये बदल झाला की उचकी सुरू होऊ शकते.

ही झाली उचली लागण्याची संभाव्य कारणं पण,  समजा तुम्हाला सतत उचकी येत आहे, तर तुम्ही काही सोपे उपाय करून पाहू शकता. पहिलं म्हणजे थोडं थोडं पाणी पिणं. दुसरा म्हणजे काही सेकंदांसाठी आरामात श्वास रोखून धरणं. आजही उचकी सुरू झाली की अनेकजण लगेच पाणी पितात किंवा काही सेकंदांसाठी श्वास रोखून धरतात. हे उपाय अनेक वर्षांपासून घराघरांत वापरले जात आहेत. काही व्यक्तींना हळूहळू श्वास घेणं आणि सोडणं यामुळेही आराम मिळतो. मात्र लक्षात ठेवा, हे उपाय प्रत्येक व्यक्तीमध्ये काम करतीलच असं नाही.

आता तुमच्या सुपीक डोक्यात पाणी पिल्याने किंवा हळूहळू श्वास घेणं आणि सोडणं या उपायांमुळे उचकी थांबल्याचा अनुभवही येतो. पण यामागचं नेमकं विज्ञान काय आहे? असा प्रश्न आला असेल तर, वास्तविक, पाणी पिताना गिळण्याच्या क्रियेमुळे उचकीशी संबंधित मज्जासंस्थेच्या सिग्नलमध्ये बदल होऊ शकतो, असा एक अंदाज आहे. त्याचप्रमाणे काही सेकंद श्वास रोखल्याने शरीरातील कार्बन डायऑक्साइडची पातळी तात्पुरती वाढू शकते. याचा उचकीच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, पाणी प्यायल्याने वेगस नर्व्हचं लक्ष विचलित होतं किंवा श्वास रोखल्याने डायाफ्रामला थेट रिलॅक्स होण्याचा सिग्नल मिळतो, असं ठामपणे सांगण्यासाठी पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. म्हणजेच, हे उपाय काही लोकांना उपयोगी पडू शकतात. पण ते प्रत्येकासाठी प्रभावी ठरतीलच असं नाही. त्यामुळे उचकी लागल्यास थोडं थोडं पाणी पिणं किंवा आरामात श्वास घेणं असे साधे उपाय तुम्ही करून पाहू शकता. मात्र श्वास जबरदस्तीने रोखू नका.

उचकी थांबत नसल्यास डॉक्टरांकडे कधी जावं?

सामान्यतः उचकी काही मिनिटांत किंवा थोड्या वेळात आपोआप थांबते. पण, जर सलग 48 तासांपेक्षा जास्त काळ उचकी सुरू राहिली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण काही वेळा पचनसंस्थेचे विकार, नसांशी संबंधित समस्या किंवा औषधांचे दुष्परिणाम यामुळेही दीर्घकाळ उचकी येऊ शकते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती सामान्य बाबींवर आधारित आहे. लेट्सअप मराठी यात दिलेल्या उपायांनी उचकी थांबेलच किंवा नमुद कारणांमुळेचं उचकी लागते असा दावा करत नाही.

Exit mobile version